पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/351

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरविली त्यानुसार कापसाला १९८६ ते १९८९ या तीन वर्षांच्या काळात २०५.८२ टक्के उणे सबसिडी होती. थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचे तर हिदुस्थानातील बाजारपेठेतील कापसाचे भाव देशी कापडगिरण्यांच्या फायद्यासाठी आंतरराष्ट्रीय भावांच्या तुलनेने सतत खाली ठेवण्यात आले आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या स्वार्थी असतात, बाजारपेठेत त्या दयामाया दाखवीत नाहीत हे खरे आहे. पण, दुसऱ्या देशात प्रति क्विंटल रु.४००० मोजून येथे आणण्याचा वाहतुकीचा खर्च करून आठशे रुपये प्रति क्विंटल विकायला त्या काही हिंदुस्थान सरकारइतक्या मूर्ख आणि अधम नाहीत!
 ही सारी शोकांतिका अशीच वर्षानुवर्षे चालू राहणार ? लक्षणे तर सारी अशीच दिसतात. बंगालच्या दुष्काळात लाखोंच्या संख्येने शेतकरी आपली कुटुंबे घेऊन अन्नाच्या शोधार्थ गावे सोडून कलकत्त्याला पोहोचले. लष्कराच्या उपयोगासाठी ठेवलेली धान्यानी भारलेली कोठारे त्यांच्या नजरेला समोर दिसत होती. कोणी एकानेही गोदाम फोडण्याचा प्रयत्न केला नाही. सारे भरल्या गोदामांच्या समोर भुकेने व्याकूळ होत मेले.
 गांधीजींनी अनेक वेळा म्हटले, "अहिंसा म्हणजे भिरुता नाही. भीतीपोटी शरण जाण्यापेक्षा हिंसाचार केलेला अधिक भला. गांधीजींच्या या वाक्यात साऱ्या शेतकऱ्यांना काही संदेश दिसू शकेल. पिढ्यान्पिढ्यांच्या शोषणाच्या चटक्यांच्या अनुभवाने निराश झालेल्या, आजच्या संकटांपुढे मूकपणे शरण जाऊन आपली पोरेबाळे तशीच उघड्यावर टाकून निघून जाणाऱ्या शेतकऱ्यांना, आज गांधीजी असते तर त्यांनी काय सांगितले असते ? 'शेतकऱ्यांनो, मारा, मरू नका! ' असे नसते सांगितले ?

(शेतकरी संघटक, २१एप्रिल१९९८)

बळिचे राज्य येणार आहे / ३५३