पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/315

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महापूर योजनेचा दुधउत्पादनावर काही विशेष परिणाम झाला नाही. उलट, परदेशातील बाजारात उतरल्यामुळे दुधाची किंमत कमी राहिली आणि दूधउत्पादन करणे शेतकऱ्यांना परवडेनासे झाले. दुधाच्या उत्पादनात प्रचंड झेप घेतली ती गुजरातने नव्हे, महाराष्ट्राने. सुपीक गुजरातपेक्षा दगडांचा महाराष्ट्र देश दूधउत्पादनात पुढे गेला. याचे कारण महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनामुळे दुधाला जास्त आकर्षक किमती मिळू लागल्या.
 हळूहळू दूधपुरवठ्याची परिस्थिती सुधारत गेली. म्हणजे भारतीयांचे दरडोई दुधाच्या वापराचे प्रमाण काही फार चांगले आहे असे नाही; पण दूध विकत घेण्यासाठी ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे त्यांना पैसा असून दूध मिळत नाही अशी परिस्थिती राहिली नाही.
 १९७३ ते १९८६ या काळात दुधाचे उत्पादन, संकलन सर्व देशात मिळून प्रतीवर्षी सरासरी सहा टक्क्यांनी वाढले. महाराष्ट्रातली वाढीची ही गती प्रतिवर्षी दहा टक्के होती, तर दूध महापूर योजनेच्या अड्डयात म्हणजे गुजरातमध्ये ही गती सर्वात कमी म्हणजे केवळ साडेचार टक्के होती. दूध महापूर योजना आणि सहकारी संस्था दूध उत्पादनातील वाढीचे श्रेय लाटू पाहात आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की दूधदत्पादन खचवल्याचे पाप त्यांच्या माथी आहे.
 दुधाचा ओघ शहराकडे
 दूध हे कष्टाच्या शरीराला, वाढत्या वयात किंवा पोषणाची गरज असलेल्यांना उत्कृष्ट अन्न आहे. या उलट, ज्यांचे जीवनमान उंचावलेले आहे त्यांची दुधाची आवश्यकता कमी होत जाते. दूध महापूर योजनेचा परिणाम असा झाला की ज्यांना दुधाची खरी गरज होती ते दोन पैसे मिळतील या आशेने कमी गरज असलेल्यांकडे दूध पाठवू लागले. ग्रामीण भागात दूध महापूर योजनेने नळ्या खुपसून तेथील अन्नातील सर्वात पोषक अंश काढून नेण्याची व्यवस्था केली. डॉ. कुरियन स्पष्टपणेच म्हणाले "दूध म्हणजे महाग प्रथिने आहेत. शेतकऱ्यांनी ती शहरांत पाठवावी आणि स्वत:ची प्रथिनांची गरज डाळींनी भागवावी."
 प्रक्रियेची चढती कमान

 दुधाचा मुबलकतेबरोबर एक नवी बदल घडून आला. जागोजाग दुधावर प्रक्रिया करून त्याचे आकर्षक, आधुनिक खाद्यपदार्थ बनवून शहरातील पश्चिमी ढंगाच्या ग्राहकांना ते पुरविण्याचा व्यवसाय सुरू झाला. खवा, खव्याची मिठाई, पनीर, चीज अशा पायरी पायरीने जाता जाता आईस्क्रीम, श्रीखंड, चॉकलेट इत्यादी पदार्थांनी बाजार गजबजू लागले. दिल्लीसारख्या शहरात

बळिचे राज्य येणार आहे / ३१७