पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/312

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गाड्यांवर खाजगी गोळीबार करतात, पोलिस अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर का नाही? मुख्यमंत्र्यांपर्यत हप्ते पोहोचवून त्यांनी सरहद्दीवरची जागा मिळवली असेलही, आता प्रत्येक कापसाच्या गाडीमागे हजारो रुपये गोळा करून गंडगंज पैसा जमा करण्याची स्वप्ने त्यांनी पाहिलेली असतील; पण ती स्वप्ने कोठेतरी दुखावतात म्हणून शेतकऱ्यांवर हातापायी आणि गोळीबार करण्याची हिंमत त्यांना होतेच कशी?
 गुन्हेगार सरकार आणि त्यांच्या बेकायदेशार कृतींची अंमलबजावणी करणारे गुंड पोलिस, आपण गणवेषात आहोत तोपर्यंत आपल्याला काही धास्ती नाही अशा थाटांत मिरवत आहेत. कापूस शेतकरी म्हणजे सर्वात शोषित शेतकरी, शेतकऱ्याच्या शोषणाविरुद्धच्या लढ्यातल्या शेवटच्या चरणात त्याच्यावर एक जबाबदारी येऊन पडली आहे. कापूस शेतकऱ्यांना लुटणे आंतरराष्ट्रीय करारांच्या विरुद्ध आहे; पण ते कायदे धाब्यावर ठेवून सरकार शेतकऱ्यांविरुद्ध उठले आहे. सरकारी गुन्हेगारीचा पाठपुरावा करण्यासाठी सरसावले आहेत. पोलिसी गुंड गणवेषात आले तरी पोलिस होत नाहीत. गणवेश घालणारे चोर गुंडच राहतात हे कापूस शेतकऱ्यांनी कृतीने दाखवून देणे जरूर आहे.

(शेतकरी संघटक, २१ फेब्रुवारी १९९४)

बळिचे राज्य येणार आहे / ३१४