पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अपेक्षा अशी आहे की इथून जाताना तुम्ही हातामध्ये एखादं नवीन हत्यार घेऊन जाल आणि हे हत्यार माझ्याकडे आहे, विचारांचे, तोपर्यंत कोणीही समोर येवो- तो स्थानिक कॉलेजमधला मान्यवर अर्थशास्त्रज्ञ असो का एखादा पुढारी असो, कारखान्याचा अध्यक्ष असो का सोसायटीचा कुणी असो त्याचा सामना मी करू शकतो हा आत्मविश्वास कमावून जाल. माझ्या हातातलं हत्यार हे जगातल्या सर्व ताकदीपेक्षा श्रेष्ठ आहे असा तुम्हाला अभिमान वाटेल. एक भला मोठा पहेलवान व दुसरा ताकदीने अगदी किरकोळ मनुष्य आहे; पण त्या किरकोळ माणसाच्या हातात जर हत्यार असलं तर तो भल्यामोठ्या पहिलवानाचासुद्धा सामना करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही इथून घेऊन जावं अशी अपेक्षा आहे त्या हत्याराच्या साहाय्याने बाकीची साधनं, संपन्नता असलेली माणसं तुमच्यापुढे फिकी पडावी.

 हे हत्यार हस्तगत करता करताच ते चालवायचं कसं याचा सरावही इथेच करायचा आहे. मनात आलेला कोणताही प्रश्न विचारायला मागेपुढे पाहू नका. इथं काही कुणी शिकवणार नाही. जसं तुम्ही तुमच्या अनुभवाचा अर्थ लावता आहात तसंच इथले प्रशिक्षकसुद्धा काही शिकून थांबलेले नाहीत. एक मोठा फरक लक्षात घ्या. शाळा-कॉलेजमधला शिक्षक साधारणपणे आवश्यक पदव्या घेतल्या, डी.एड्.- बी.एड्. झालं की, शिक्षण त्याचं साधारणपणे थांबतं. आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो आहोत तो विषयच मुळी थांबणारा नाही. हा विषय सतत वाढणारा, सतत बदलणारा आहे. आकाशातल्या ताऱ्यांचा अभ्यास जसा, १५ दिवस केला, वर्षभर केला, ...आणि म्हटलं की मला सगळं समजलं, तर ते काही खरं होत नाही. हजारो वर्षांनी ताऱ्यांची पुन्हा तीच स्थिती कधी येत असेल तर असेल. त्यांच्या सगळ्या हालचालीविषयी माहिती जर पाहिजे असेल तर सतत पाहाणे, सतत विचार करणे, सतत अभ्यास करणे याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की १९८० मध्ये ज्या परिस्थितीमध्ये शेतकरी संघटनेने कामाला सुरुवात केली तिच्यात आणि आजच्या परिस्थितीत म्हटलं तर काहीच अंतर नाही आणि म्हटलं तर महद्अंतर आहे. म्हटलं तर खूपच घडून गेलं आहे आणि म्हटलं तर परिस्थिती पुष्कळशी तीच आहे; पण काय बदललेलं आहे आणि काय बदललेलं नाही याचा जर विचार आपण केला नाही आणि ८० मध्ये जी वाक्यं म्हणत होतो ती त्याच पद्धतीने, त्याच ठेक्यात, त्याच जोशामध्ये आणि त्याच आवेशाने म्हणत राहिलो तर सत्यनारायणाची पूजा सांगणारा ब्राह्मण आणि आपल्यात

बळिचे राज्य येणार आहे / ३२