पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिवसाची भाकरी खाईल; पण त्याला जर का कुऱ्हाड दिली तर तो कामाला लागेल आणि रोज भाकरी खाईल अशी गोष्ट आमच्या लहानपणी सांगितली जाई. इथे तुम्हाला, शेतकऱ्यांच्या पुढे जाऊन मांडण्याकरिता अशी काही तयार गाठोडी, तयार शिदोरी दिली जाणार नाही. विचार कसा करावा इथपासून तुमच्या मनाची खात्री पटवून घेणं हा खरं तर इथल्या प्रशिक्षणवर्गाचा हेतू आहे आणि एकदा हे विचाराचं हत्यार तुम्हाला गवसलं की मग आपापल्या गावी गेल्यानंतर, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात गेल्यानंतर नवीन काही प्रश्न निर्माण झाला तर, "आम्हाला काही याचं उत्तर शिबिरात सांगितलं नव्हतं." असं म्हणायची वेळ येणार नाही. पाठांतरावर भिस्त असणारा एखादा ढ विद्यार्थी कसं म्हणतो? परीक्षेचा पेपर फुटला आहे; पण याचं उत्तर काय द्यायचं ते आपल्याला मास्तरांनी सांगितलेलं नाही; पण जो अभ्यासू असतो तो म्हणतो गुरुजींनी हाच प्रश्न नेमका नाही सांगितला; पण त्या अमुक एका प्रश्नाच्या उत्तरात जी रीत गुरुजींनी सांगितली ती या प्रश्नाच्या परिस्थितीत वापरली म्हणजे उत्तर येतं.

 या स्वरूपाचं, एक फार आनंद देणारं उदाहरण घडल्याचं मला आठवतं. १९८४ सालच्या महाराष्ट्र प्रचारयात्रेतील घटना आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका गावी प्रचारयात्रा थांबली होती. काहीतरी कुरमुरे वगैरे वाटण्याचं काम चालू होतं. दोन कार्यकर्ते एकमेकांत चर्चा करत होते. विषय होता, नुकतेच बिहारमध्ये एका हरिजन शेतमजूर बाईवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा. एक कार्यकर्ता म्हणत होता, "तिथे शेतकऱ्याने त्या बाईवर बलात्कार केला. मग तुम्ही कसं म्हणता की शेतकरी विरुद्ध शेतमजूर असा संघर्ष नाही?" त्यावर दुसऱ्या कार्यकर्त्याने अत्यंत शांतपणे सांगितलं की, "त्या हरिजन शेतमजूर स्त्रीवर बलात्कार झाला याचं एकमेव कारण आहे की शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही." त्याने जो काही तर्क मांडला, जो काही निष्कर्ष काढला तो तर आहेच पण हे सारं त्यानं ज्या आत्मविश्वासानं सांगितलं हे पाहता त्यामागे एक मोठा अर्थ आहे की, सगळ्या समाजातल्या सगळ्या छेदाछेदांचं कारण काय? सगळ्या समाजाला जी काही साचलेल्या डबक्याची अवस्था प्राप्त झाली आहे त्या डबक्यातले किडे एकमेकांशी जी काही मारामारी करताहेत त्यामागचं जे काही तात्पुरतं कारण आहे त्याचं काय महत्त्व आहे ? मुळामध्ये डबकं झालंय मग त्यातले किडे किड्यासारखेच वागायला लागतात. हे त्यानं मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं.

बळिचे राज्य येणार आहे / ३१