पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आणि ही लहानसहान नव्हे, फार मोठी गोष्ट आहे. मी विद्यार्थ्यांना एक पत्र लिहिलं आहे, "शेतकरी विद्यार्थी संघटना काढायची म्हणजे कुठं जाऊन मिरवणुका काढायची गरज नाही, कुठं जाऊन दगड फेकायची गरज नाही. तुम्ही आंदोलनात यावं अशीही माझी इच्छा नाही. कारण तुम्हाला मी आंदोलनात ओढलं तर उद्याचं बियाणं मी आजच खाण्याकरिता वापरून टाकलं असं होईल. तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात. उद्या शेतकरी समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुमच्या या काळामध्ये तुम्ही विद्याच करणं आवश्यक आहे. पण ही विद्या करताना, जी करता ती विद्याच आहे किंवा नाही हे तपासून पाहा. नाहीतर अविद्या ही तुम्हाला विद्या म्हणून शिकविली जाईल आणि एका अर्थाने तुम्ही हनुमानासारखे आहात. 'भूमिकन्या' सीतेच्या शोधात रावणाच्या लंकेत आला आहात आणि रावणाचं सगळं एवढं मोठं वैभव, सोन्याची लंका. रामाकडे काय असणार - फाटकी वल्कलं नेसून जंगलात कंदमुळं खाणारा तो. तुम्हाला आईबापांनी खेडगावातनं शहरात पाठवलं, या झगझगत्या, सगळे ऐश्वर्य असलेल्या जगामध्ये पाठवलं आणि जर का तुम्ही रावणाच्या या सोन्याच्या लंकेच्या मोहात पडलात तर सीतेला तुम्ही तसंच सोडून रावणाच्याच दरबारात दाखल होण्याची शक्यता आहे आणि मग रामायण कधी घडायचंच नाही. कदाचित, तुम्हाला रावणाच्या दरबारात, जेव्हा पुढे कधी राम येईल तोपर्यंत सुखाची नोकरी मिळेल. पण तेवढ्या काळात सीतेची काही मुक्ती होणे शक्य नाही."
 मग काय विचार करा म्हणून मी विद्यार्थंना सांगितलं? "ही जी माणसं आजूबाजूला तुला दिसतात, चांगल्यापैकी घरात राहतात, घरात दिवे आहेत, खिडक्यांना पडदे लावलेले आहेत, आईबाप-मुलं एकमेकांशी बोलतात, खेळतात, फिरायला जातात. ते काही फार श्रीमंत आहेत असं नाही; पण कुटुंब म्हणून जे काही आयुष्य असतं ते जगतात. तुम्ही निदान स्वतःला असा प्रश्न विचारा की, माझ्या आई-बापांनी असं कोणतं पाप केलं आहे की त्यांना असं कधी जगता आलं नाही, एक दिवससुद्धा? हा प्रश्न जर तुम्ही विचारला नाही स्वतःला तर तुम्ही विद्यार्थी नाही आणि या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला दिलं गेलं नाही तर तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजात शिकविली जाणारी विद्या ही मुळी विद्याच नाही."

 ज्याने आसपासच्या परिस्थितीचा अर्थ लागत नाही ती विद्या कसली? इथं तुम्ही जे आला आहात तेसुद्धा पुस्तकं, काही वाक्यं पाठ करण्याकरिता नाही. एखाद्या भुकेलेल्याला जर दयाबुद्धीने काही पैसे दिले तर तो कदाचित त्या

बळिचे राज्य येणार आहे / ३०