पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/275

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गावातून दूध शहराकडे खरवस, खवा, लोणी, तूप याच्या स्वरूपात प्रामुख्याने जाई. दूध घरच्या खाण्यासाठी आणि ताक तर फुकट वाटण्यासाठी अशी बहुतेक दुभती जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती होती. जिल्ह्याच्या शहरात वाड्यावाड्यातून कोणी ना कोणी म्हशी पाळी आणि दुधाचा रतीब आसपास घातला जाई. मुंबईसारख्या शहरात रतीबाच्या सोयीने जागोजागी दूध व्यवसाय करणारे म्हशींचे गोठे चालवत असत.
 दूध हा व्यवसाय नसल्यामुळे गायी-म्हशींची उपेक्षा अपरिहार्यपणे झाली. देवाला नेवैद्य दाखवून झाला म्हणजे तो पुजाऱ्याच्याच तोंडात जातो. गाय ही देवता खरी; पण भरभरक्कम खायला मागणारी देवता आणि निम्म्या आयुष्यात खात्याच्या बदल्यात काहीच न देणारी देवता. त्यामुळे काही खानदानी गायी सोडल्यास बाकीच्यांची उपेक्षाच झाली. आजही भररस्त्यात वाहतुकीमध्ये फतकल घालून बसलेल्या गायी दिसतात. अगदी भाजी बाजारातील टोपलीत किंवा किराणा दुकानातील डब्यात तोंड घालताना गायी दिसतात; पण ज्यांचे एवढे भाग्य नाही त्या गायींनी काय करावे? आणि सर्वसाधारण वर्षात अशी परिस्थिती, मग दुष्काळाच्या वर्षात काय विचारावे ?

 आर्यांच्या टोळ्या पूर्व युरोपातून निघून भारतात उतरल्या. आपल्या गायींचे कळप घेऊन हे गोवंश पालक आले असे म्हणतात. त्यांनी आणलेल्या गायी काही सध्या दिसणाऱ्या गायींप्रमाणे एक वशिंडाच्या असणार नाही तर सध्याच्या संकरित गायीप्रमाणे सपाट पाठीच्या असणार. या गायींची मिजास खूप राखावी लागते. खाणे, पिणे, उष्णतामान यात थोडी हयगय झाली तरी या संकरित गायी कायमच्या निकामी होऊन जातात. म्हणूनच काळाच्या ओघात आर्यांच्या टोळ्यांबरोबर आलेल्या गायी निर्वंश होऊन संपल्या असाव्यात. राहिल्या त्या एक वशिंडाच्या गोमाता आणि नंदी. यांचे बिचाऱ्यांचे एक चांगले आहे. त्या खायला फारसे मागत नाहीत, मिळेल त्यावर गुजराण करतात, अर्धा पाऊण लिटर दूध देतात; पण दुष्काळातही पुष्कळशा जगून राहतात. जमिनीवरती बोटबोट आलेले सुद्धा हिरवे पिवळे कसलेही गवत त्या खुरडून घेतात. जमिनीवरचे गवताचे संरक्षण समूळ संपवूनही टाकतात. तरीही नंदी जातीच्या गोमाता जगात फारश्या देशात नाहीत. बांगला देश, पाकिस्तान, भारत (भारतीय उपखंड) त्याखेरीज इथिओपिआ, टांझानिया एवढाच त्यांचा प्रदेश -योगायोगाने म्हणा का कार्यकारण भावाने म्हणा नेमका हाच प्रदेश जगातील सर्वात भणंग गरीब प्रदेश आहे.

बळिचे राज्य येणार आहे / २७७