पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सांगितला आणि ऐकता ऐकता शेतकऱ्यांच्या मनात यायला लागलं की अरे, हे खरं आहे, कारण माझा अनुभव असा आहे, माझी जी प्रचीती होती त्या प्रचीतीचा सिद्धांत फक्त कळतो आहे, शब्द संघटनेचे आहेत; पण अनुभव माझा आहे. ही जाणीव जेव्हा सगळ्या शेतकऱ्यांमध्ये झाली तेव्हा ते महाराष्ट्रभर चालवलेलं एक खुलं विद्यापीठ, खुल्या आकाशाखालचं विद्यापीठ होतं. हजारो सभा झाल्या; पण ते एका आर्थाने शिक्षणच होते.
 अनुभवांच्या अनाकलनीय तुकड्यांच्या गाठोड्याला जाणिवेने एकसंध चित्राच्या स्वरूपात पाहाण्याइतपत बदल महाराष्ट्रामध्ये घडून आला; पण सगळ्या सभांमध्ये काय कितपत सांगितलं जातं? कोणत्याही एका गावी काही ठराविक वेळ दिला जात नाही. इतरही बंधनं असतात. स्थानिक कार्यकर्त्यांनाही वाटतं की इतकी सभा जमली आहे तर आपणही थोडं बोलावं. मग जो काही सभेचा तासदीडतास वेळ असेल त्यातील अर्धा-पाऊण तास मला किंवा सभेसाठी गेलेल्या प्रमुख कार्यकर्त्यास मिळतो. मग सर्वसाधारण लोकांना ज्यात स्वारस्य आहे, अगदी नव्याने शेतकरी संघटनेशी ओळख करून घेत आहे अशा शेतकऱ्यांनासुद्धा समजतील असेच विषय फक्त त्या सभेत घेता येतात. बहुतेक लोकांच्या गाठोड्यांतील अनुभवांच्या तुकड्यांची संगती लागते एकमेकांशी; पण तुमच्यासारख्या काही लोकांच्या बहुतेक तुकड्यांची संगती लागली तरी काही तुकडे तसेच राहून जातात. बाकी सर्व समजलं भाषणातून ; पण अमुक अमुक गोष्टींचा यातून खुलासा होत नाही. शिल्लक राहिलेले हे प्रश्न कसे सोडवायचे?

 हे सोडवण्याकरिता, खरं म्हणजे, कृषि अर्थ प्रबोधिनीतील या प्रशिक्षणवर्गांची योजना आहे. इथं काही शिकायचं आहे आणि मग इथून जाऊन, इथं डोक्यावर घेतलेलं ज्ञानाचं गाठोडं तिथं जाऊन शेतकऱ्यांच्या डोक्यावर ओतायचं आहे असा काही प्रकार नाही. किंबहुना, इथून तुम्ही गेल्यानंतर शेतकरी संघटनेच्या प्रचाराचं काम केलंच पाहिजे असासुद्धा मुळीच आग्रह नाही; पण माझी खात्री आहे की, जो मनुष्य इथं मन उघडं ठेवून नीटपणे विचार व विचारपद्धती समजावून घेईल त्याला असा काही एक भुंगा इथं लागणार आहे की तो घरी गेल्यानंतर त्याला स्वस्थ बसूच देणार नाही. एखादी गोष्ट पटली नाही तर पटली नाही असे स्पष्टपणे सांगायला काही हरकत नाही; पण निदान तो विचार समजून घेताना जे जे काही सांगितलं जात आहे त्याचा आपल्या अनुभवाशी काही संबंध आहे का एवढं फक्त प्रामाणिकपणे तपासून घ्यायचं आहे.

बळिचे राज्य येणार आहे / २९