पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साप्ताहिक 'वारकरी' चालला, मग त्यानंतर पाक्षिक 'शेतकरी संघटक' चालू झाला, पुढे काही काळ साप्ताहिक 'ग्यानबा' चालला. आता पुन्हा 'शेतकरी संघटक'; पण या साहित्यामुळेच काही बदल घडून आला किंवा हा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला असं म्हणणं कठीण आहे. मग हा प्रचार घडला कसा?
 एका बाजूला काँग्रेस (आय्)ची सत्ता, काँग्रेस (आय्)नं सगळ्या शेतकऱ्यांमध्ये सहकारी संस्थांचं जाळं विणलेलं. प्रत्येक जिल्हामध्ये, प्रत्येक तालुक्यात एखादा सहकारमहर्षि, सहकारश्रेष्ठी. कुणी काका, कुणी अण्णा, कुणी तात्या, कुणी मामा. हे सर्व साहेब सर्व शेतकऱ्यांना अगदी पंजामध्ये पकडून बसलेले आणि तरीदेखील एवढ्या ताकदीच्या विरुद्ध जाऊन शेतकरी संघटना हा विचारातला बदल कसा काय घडवून आणू शकली ? खरं तर हा चमत्कारच वाटावा. पण याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे; पण हे उत्तर खरं आणि शेवटचं आहे असं मलाही वाटत नाही.

 मला असं वाटतं की शेतकरी संघटनेने लोकांसमोर जाऊन त्यांच्यापुढे एक आरसा ठेवला. जो काही विचार सांगितला तो ऐकल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये असं काहीतरी वाटायला लागलं की, अरे आता कुठं काही तरी जमलं, इतके दिवस जे काही विस्कळीत चित्र वाटत होतं ते या आरशात पाहिल्यानंतर त्याचे तुकडे एकमेकांना जमतात. सगळ्या प्रश्नांची उत्तर इथं मिळतात असं त्या शेतकऱ्यांना प्रामाणिकपणानं वाटायला लागलं म्हणून शेतकरी संघटनेचा विचार पसरला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जन्मल्यापासून किंवा समजायला लागल्यापासून एक अनुभवाचं मोठं गाठोडं तयार झालेलं असतं; पण ते वेगवेगळे अनुभव वेगवेगळे तुकडे असल्यासारखे आहेत. आजच्या अर्थव्यवस्थेत आणि शिक्षणपद्धतीत या तुकड्यांना एकत्र करील असा विचार नाही. या शिबिरातील एका कार्यकर्त्याने शेतकरी म्हणून अनुभव घेतला, उसाच्या शेतीचा. त्याच्यानंतर व्यापारी म्हणून अनुभव घेतला. उसाला भाव मिळाला नाही आणि व्यापारी झाल्यानंतर तिथेसुध्दा थकबाकी वाढतच राहिली. कारण आजूबाजूचे काय कापूस, ऊस पिकविणारे शेतकरी असतील त्यांचीसुद्धा थकबाकी देण्याची पात्रता नाही किंवा ताकद नाही. असे सगळे वेगवेगळ्या अनुभवांचे तुकडे एकत्र असलेले गाठोंडे घेऊन प्रत्येकजण चाललेला. त्या सगळ्यांचा अर्थ लावण्याची ताकद काही आपल्यात फारशी नसते किंवा अर्थांच्या बाबतीत दिशाभूल झालेली असते. शेतकरी संघटनेने आपला विचार

बळिचे राज्य येणार आहे / २८