पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/257

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रूपाच्या वर्णनाने काय साध्य होणार?
 सहकारी संस्था चालल्यामुळे असा काही संपन्नतेचा देखावा जागोजागी तयार झाला हे खरे. काही सहकारसम्राट कोट्यवधींची माया जमवून बसले हेही खरे. काही जणांनी त्यातून राजकारण साधले आणि पार दिल्लीपर्यंत जाऊन पोचले हेही खरे पण ज्या हेतूने सहकारी संस्था सुरू करण्यात आल्या तो हेतू कुठेच सफल झाला नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांची, शेतमजुरांची गरिबी दूर करण्यात सहकारी चळवळीचे अपयश भयानक आहे. सहकारी चळवळीने ग्रामीण भागातील गरिबी दूर केली नाही. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागाच्या शोषणाला सहकारी चळवळीने हातभार लावला आणि सहकारातून तयार झालेल्या नेतृत्वाने दिल्लीत शिजणाऱ्या शेतकरीविरोधी धोरणाचा चुकूनसुद्धा कधी विरोध केला नाही.
 सहकारी चळवळीतील श्रेयाचा तोरा मिरवणाऱ्यांना सहकारी चळवळीच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. आयुष्यभर सहकारात घालवून शेतकऱ्यांना बुडवणाऱ्यांच्या हातात हात घालून राजकारण केल्यानंतर जर एखाद्या सहकार महर्षीला जाणीव झाली की देवाच्या आळंदीऐवजी तो चोरांच्या आळंदीला येऊन पोचला आहे, तर शेतकऱ्यांच्या सेवेकरता उतरताना शेतकऱ्यांच्या रक्ताने भरलेली मानवस्त्रे दूर फेकून देण्याची आणि स्वच्छ होऊन शेतकऱ्यांच्या पुढे येण्याची त्याची हिंमत असली पाहिजे.


 १. विविध सेवा सहकारी पतपेढी (सोसायट्या)


 सहकारी संस्थांचे सर्व शेतकऱ्यांना माहीत असलेले स्वरूप म्हणजे ज्याच्या त्याच्या गावची विविध सेवा सहकारी पतपेढी. एवढे जडबंबाळ नाव घेण्याऐवजी सगळेजण त्याला नुसतेच सोसायटी म्हणतात.
 गावातला कोणी शेतकरी सोसायटीचा चेअरमन झाला की काही दिवसांत त्याची तालुका पातळीवरील पुढाऱ्यांकडे, आमदारांकडे, बँकेत ये-जा चालू होते. टोपी अधिकाधिक टोकदार बनत जाते. कपडे दिवसेंदिवस कडक इस्त्रीचे आणि झगझगीत पांढरे बनत जातात.

 सोसायटीचा सेक्रेटरी हा पगारदार माणूस असतो. तालुक्याच्या बँकेच्या चेअरमनकडून त्याची नेमणूक होत असते. लागेबांधे असल्याखेरीज सेक्रेटरीची जागा मिळूच शकत नाही. ओळख फार जवळची नसेल तर पाचदहा हजारांवर

बळिचे राज्य येणार आहे / २५९