पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/256

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शक्यता आहे त्या यच्चयावत गोष्टी अगदी रास्त भावात आणि चांगल्या प्रतीच्या मिळू शकतात. या वस्तू खरिदण्याकरिता संस्थेची जगभर जवळजवळ सगळ्या देशांत केंद्रे आहेत. साधा शेंगदाणा तो काय पण ग्राहकाला विविध प्रकारचा शेंगदाणा मिळाला पाहिजे, तो स्वस्तात मिळाला पाहिजे आणि त्याबरोबर न चुकता मिळाला पाहिजे. याकरिता उत्पादकालाही काही उत्साहवर्धक उत्तेजन मिळाले पाहिजे या दृष्टीने त्यांचे व्यवहार चालतात. शेंगदाणा खरेदीचे ते जे व्यवहार आज करत आहेत तो शेंगदाणा एकोणनव्वद साली स्वीस दुकानांत येईल. शेंगदाणा खरेदीचे काम बघणाऱ्या तिथल्या माणसाला चाकण आणि मंचर इथल्या शेंगदाण्यांचे वैशिष्ट्य तोंडपाठ माहीत होते. दर वर्षाच्या शेवटी ग्राहक म्हणून जितकी खरेदी करेल त्या रकमेवर मला बारा ते वीस टक्के डिव्हिडंड मिळत असे; पण एवढ्या जगव्याळ सहकारी संघटनेचे महर्षी किंवा सम्राट म्हणून कुणाचा बोलबाला मी कधी ऐकला नाही. एवढेच नव्हे तर या संस्थेचे पदाधिकारी बनण्याकरिता लक्षावधींची उधळमाधळ झाली असे कधी कानावर आले नाही. निवडणुका जिंकण्यासाठी प्रतिस्पर्थ्यांच्या पाठीराख्यांना पळवून नेण्यात आले असे कधी घडले नाही किंवा ज्यात माल ठेवायचा त्या बारदानांच्या कमिशनवर कुणी सहकारमहर्षी कोट्यधीश बनला हे तर असंभवच.
 सहकारी चळवळींचा उदोउदो करणारे पुढारी अनेकदा इतर देशांतील सहकारी चळवळींचे उदाहरण देतात; पण ज्या सहकारी चळवळीचा प्रामुख्याने उल्लेख होतो त्या युरोपातील सहकारी पद्धतीचा आणि आपल्या देशातील सहकारी पद्धतीचा काहीही संबंध नाही. आपल्या देशात तयार झालेली पद्धत हे काही एक विचित्रच जनावर आहे. कित्येक वर्षे या सहकारी चळवळीने अपयशाखेरीज काहीच मिळविले नाही आणि तरीही एखादे धनंजयराव गाडगीळ मधूनच 'सहकार अयशस्वी झाला आहे; पण सहकार यशस्वी झालाच पाहिजे' अशा घोषणा देतात.

 सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध सोसायट्या यांच्यामुळे गावोगावी रोजगार तयार झाले, डांबरी सडका झाल्या, विजेचे दिवे आले, मोटारसायकली, जीपगाड्या इकडे तिकडे फिरताना दिसू लागल्या, काही कारखान्यांच्या परिसरांत नमुनेदार गुलाबांच्या बागा उभ्या राहिल्या तर काही ठिकाणी कारखान्यांना जोडून वाद्यवृंद तयार झाले. तांत्रिक शाळा तयार झाल्या याचाच डिण्डिम अनेक सहकार महर्षी वाजवताना दिसतात; पण बैल घेतला तो औताची कामे करायला. औताला जुंपला की बैल बसत असेल तर त्याच्या रंगाच्या आणि

बळिचे राज्य येणार आहे / २५८