पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/255

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक संस्था जी सहकारी संस्था तिच्या नावाचे मात्र चळवळीचे बारसे होते.
 या सहकारी संस्थांचे आणखी एक वैशिष्ट्य. शहरांमध्ये सहकारी संस्था नसतात असे नाही, काही किरकोळ बँका, काही ग्राहक सेवा संघ आणि प्रामुख्याने गृहनिर्माण संस्था सोडल्या तर शहरातील आर्थिक उलाढाली प्रामुख्याने खाजगी आणि सार्वजनिक कंपन्या चालवतात. धंदा छोटा असला तर तो खाजगीत किंवा भागीदारीत चालवतात; पण शहरी व्यवस्थेत सहकाराला स्थान कमीच.
 याउलट ग्रामीण भागांतील जवळजवळ सर्व आर्थिक व्यवसाय हे सहकाराशी कोठेतरी जोडले गेले आहेत. गावांतील विविध सेवा सहकारी संस्था असो, खरेदी-विक्री संघ असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो, भूविकास बँक असो का दूध, हातमाग, साखर यासारख्या वस्तूंच्या उलाढाली करणाऱ्या संस्था असोत. गावागावातील किरकोळ वाणी आणि बलुतेदारांचे खाजगी व्यवसाय सोडले तर सगळीकडे सहकाराच्याच पाट्या दिसतात. थोडक्यात इंडियाचे व्यवहार सगळे कंपन्यांचे; पण भारतातील व्यवहार तेवढे सहकारी अशी फाळणी दिसते.
 खाजगी किंवा सार्वजनिक कंपन्यांचे संचालक किंवा अध्यक्ष हे राजकारणात क्वचितच आढळायचे. ते बिचारे त्यांच्या कंपन्या चालवण्याच्या कामात गर्क राहतात; पण सहकारात मात्र असे नाही. सहकारात आहे आणि राजकारणात नाही असा महर्षी जवळ जवळ अशक्यच. किंबहुना राजकारणात घुसखोरी करता यावी यासाठी उमेदवारी करायचे क्षेत्र म्हणजे सहकार! यादृष्टीनेच होतकरू आणि पोहचलेली पुढारी मंडळी या क्षेत्राकडे पाहत असतात.
 कोणताही व्यवसाय चालवण्याचा सहकार हा एक मार्ग किंवा पद्धती आहे असे म्हटले तर सहकार आणि कंपन्या यांच्यात हे जे फरक दिसताहेत ते का दिसावेत ? मी सहकारसम्राटांना अनेकदा धारेवर धरतो. लोक मला विचारतात, "तुम्ही सहकारी चळवळीच्या विरुद्ध आहात काय?" मी सहकारी चळवळीच्या विरुद्ध नाही तसाच प्रा.लि. कंपन्यांच्याही विरुद्ध नाही आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यांचेही काही मला प्रेम नाही.

 परदेशात असताना मी एका फार मोठ्या सहकारी संस्थेचा सदस्य होतो. पदाधिकारी नव्हतो. केवळ कुतूहल म्हणून मी त्या संस्थेच्या कामकाजाचा अभ्यास केला होता. या संस्थेची एकट्या स्वित्झर्लंडमध्ये हजारो दुकाने होती आणि या सगळ्या दुकानांतून ग्राहकांना ज्या ज्या काही गोष्टींची गरज पडण्याची

बळिचे राज्य येणार आहे / २५७