पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/252

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुद्द्यांवर आपण चांगले बोलू शकतो अशी ज्यांना खात्री आहे त्यांनी त्यांचा त्यांचा आंदोलनाचा मार्ग चालू ठेवावा. त्यांनी माझ्याच सोबत आले पाहिजे असा काही माझा आग्रह नाही; पण तुमच्यापैकी कोणाच्या मनात असे असेल की शेतकरी संघटनेमध्ये तुम्हाला योग्य तो मान मिळाला नाही किंवा तुम्हाला सावत्रपणाची वागणूक दिली गेली तर श्रीरंगनानांच्या साक्षीने, मी कुटुंबप्रमुख म्हणून ती माझी चूक मानतो आणि तुमची माफी मागतो आणि परत या अशी हाक देतो.
 शेतकऱ्यांच्या दृष्टीने पुढचे दिवस अत्यंत कठीण आहेत. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याची ही वेळ नाही. १९८९ मध्ये, आता दोन वर्षांत शेतकरी कर्जमुक्ती होऊ शकेल अशी शेतकरी आंदोलनाची ताकद तयार झाली होती त्या वेळी महेंद्रसिंह टिकेत यांनी हल्ला केला आणि शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला. आज ते पाप तुम्ही करू नका, तुम्ही कोणत्याही पक्षात गेला असा किंवा नसा. शेतकरी संघटना जर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी करीत असेल तर 'कर्जमुक्ती' आणि 'कर्जमाफी' या दोन शब्दातील भेदसुद्धा न समजता '२५००० पर्यंत कर्जमाफी द्या' म्हणणाऱ्या पक्षांसोबत एक दिवससुद्धा तुम्ही राहू नका.
 श्रीरंगनानांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार न बाळगता त्यांची शेतकरी-शेतमजूर संघटना पिंपळगाव-बसवंतच्या १९८०च्या सभेत शेतकरी संघटनेत मिसळून टाकली, आपले नाव ठेवण्याचाही आग्रह त्यांनी धरला नाही. त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की, 'तुमच्या मनात प्रामाणिकपणे शेतकऱ्यांविषयी तळमळ असेल, केवळ अहंभाव नसेल' दुसऱ्या कोणाचा हवाला घेऊ नका, तुमच्या आत्म्याला विचारा केवळ काही रुसवेफुगवे झाले म्हणून दूर झाला असाल तर मी तुमची माफी मागितली आहे तर शेतकऱ्यांमध्ये वेगळ्या चुली करू नका. कारण १९८० मध्ये शेतकऱ्यांवर जितकी कठीण परिस्थिती गुजरली होती त्याहीपेक्षा जास्त कठीण वेळ पुढील पाच वर्षांत येणार आहे. त्यासाठी, सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन येणाऱ्या परिस्थितीचा सामना केला तरच शेतकरी जगू शकतो.

(शेतकरी संघटक, ६ जानेवारी २००९)

बळिचे राज्य येणार आहे / २५४