पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/248

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चर्चा झाल्या तेथेच मला तुम्हाला फूल देऊन तुमचा सत्कार करायचा आहे" आणि नानांचा मोठेपणा म्हणजे ते त्यांच्याभोवती जमलेल्या प्रेमीजनांच्या गराड्यातून उठून आपल्या वाड्यावर त्वरेने आले आणि त्यांनी माझ्या भावनांची कदर केली. नानांनी जर का या सत्कार समारंभाला मान्यता दिली नसती तर या सगळ्याच अनुभवाला मुकावे लागले असते.
 आजकाल दिवस असे आहेत की तालुक्याच्या, पंचायत समितीच्या किंवा जिल्ह्याच्या एखाद्या फडतूस कार्यकर्त्याचा ५१वा किंवा ५२वा जरी वाढदिवस असला तरी दूरदर्शनवर त्याच्या जाहिराती दिवसभरात पन्नास वेळा दाखवतात. हे दाखवणारे काही प्रेमाने दाखवतात अशीही काही गोष्ट नाही ; ज्याचा सत्कार असतो त्यानेच, बहुधा, त्याच्या खर्चाची आणि जाहिराती देण्याची व्यवस्था केलेली असते. अशा या जाहिरातींच्या युगात नानांसारखा कार्यकर्ता फक्त शेतकरी संघटनेच्याच मुशीतून तयार होऊ शकतो. शेतकरी संघटनेच्या संपूर्ण इतिहासात कधी कोण्या कार्यकर्त्याची अशी जाहिरात दूरदर्शनवर कोणी दिली नाही आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही अशा अपेक्षेने काम करीत नाहीत. नानांनी आपल्या भाषणात अत्यंत विनम्रपणे सांगितले की आम्ही काय फार मोठे काम केले असे आम्हाला खरोखरच वाटत नाही आणि त्याकरिता पाच पैसे खर्च करून त्याचे नगारे बडवणारी कोणी जाहिरात लावावी हे आमच्या धर्मात बसत नाही.

 या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी सुरुवातीला मुद्दा काढला की नानांची शेतकरी-शेतमजूर संघटना आधी चालू झाली का शरद जोशींची शेतकरी संघटना आधी? हा काय वाद आहे? एव्हरेस्टवर पहिल्यांदा हिलरी गेला का तेनसिंग याबद्दल एखादवेळेस वाद होऊ शकतो; पण हा वाद सुदैवाने माझ्यामध्ये आणि नानांमध्ये कधी आला नाही. त्याचे स्पष्टीकरण अगदी साधे आहे. नानांचा हा सत्कार ज्या सभागृहात होत आहे त्याला ज्या मुकुंदराजांचे नाव दिले आहे त्या मुकुंदराजांनी ज्ञानेश्वरांच्या आधी २००-३०० वर्षे 'विवेकसिंधु' ग्रंथ लिहिला. भक्तिमार्गाचा खरा सिद्धांत मुकुंदराजांनी 'विवेकसिंधु'च्या रूपाने जगासमोर पहिल्यांदा मांडला; पण विठोबाच्या दर्शनाला जाणाऱ्या सगळ्यांच्या तोंडी ज्ञानोबाचे नाव येते, तुकोबाचेही येते; मुकुंदराजाचे कधी येत नाही. काव्यामध्येसुद्धा 'ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा' असेच वर्णन येते. मुकुंदराजांची उपेक्षा झाली हे खरे आहे. मराठवाड्यात इतरही अनेक मोठेमोठे साहित्यिक होऊन गेले; पण त्यांना मिळायला हवी

बळिचे राज्य येणार आहे / २५०