पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/246

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शेतकरी एकजुटीच्या निकडीचा काळ



 श्री. श्रीरंगनाना मोरे यांच्या या अमृतमहोत्सव सत्कार समारंभात मला उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी या समारंभाच्या सत्कार समितीचे आभार मानतो. आभार यासाठी की मी काल येथे आल्यापासून, शेतकरी संघटनेच्या कामात १९८० पासून ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला ती सगळी मंडळी, विशेषत: मराठवाड्यातील मला भेटत होती. एवढेच नव्हे, तर काही समजांमुळे किंवा गैरसमजांमुळे थोडी वेगळी झालेली मंडळीसुद्धा नानांच्या प्रेमामुळे, नानांच्या या कार्यक्रमामुळे येथे आवर्जून हजर आहेत त्यांचीही भेट झाली. या कार्यक्रमाला हजर असलेले हे सगळे नानांचे प्रेमी आहेत; आणि हजर राहणार म्हणून ज्यांची नावे चर्चेत होती त्यापैकी जे आलेले नाहीत ते बहुतेक माझ्यावरच्या रागामुळे आले नसावेत. माझ्यामध्ये इतर अनेक गुण आहेत, पण मी माणसे सांभाळणारा नाही असे बरेच लोक म्हणतात. हे खरे असावे. रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका गुणाचा मोठा आवर्जून उल्लेख केला आहे. 'शिवरायांची सलगी देणे कैंचे असे!' श्रीरंगनानांनी एखाद्याला सलगी दिली म्हणजे तो जन्मभर त्यांचा मित्र आणि प्रेमी राहणार. माझ्या एका अध्यक्ष कार्यकर्त्याने मला एकदा सांगितले होते की, 'साहेब, तुम्ही आमच्यापैकी कोणाचंही कौतुक करीत जाऊ नका. तुम्ही कौतुक केलं म्हणजे ती माणसं बिघडतात.' हा 'सलगी' देण्याचा गुण मला जमला नाही आणि म्हणून कदाचित मला मानणारे बरेचसे लोक बाजूला बसले असण्याची शक्यता आहे.

 हे खरे आहे की नानांच्या स्वागताध्यक्षपदाखाली १९८४ साली परभणीला जे अधिवेशन झाले त्या अधिवेशनाने शेतकरी संघटनेला 'रुमणेधारी शेतकऱ्यांचे चिन्ह आणि छातीला लावायचा बिल्ला दिला. आजही माझ्या दिल्लीच्या

बळिचे राज्य येणार आहे / २४८