पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/244

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केल्या असत्या की ज्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जाच्या सापळ्याकडे जावे लागले नसते. घडले आहे ते नेमके याच्या उलटे. गेल्या वर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी गहू आणि भात यांच्या वायदे बाजारावर बंदी घातली. नव्याने उभ्या राहणाऱ्या खुल्या बाजार यंत्रणेवर हा क्रूर घाला होता. या वर्षाच्या अर्थसंकल्पात त्यांनी या यंत्रणेवर आणखी क्रूर घाव घातला आहे. त्यांनी शेतीमालांच्या वायदे बाजारावरील बंदी उठवली तर नाहीच, उलट वायदे बाजाराच्या उलाढालींवर कर लावला आहे. त्यामुळे वायदे बाजाराच्या विकासप्रक्रियेचे कंबरडेच मोडणार आहे. याच अर्थमंत्र्यांनी शेअरबाजाराबद्दल जी आस्था दाखवली त्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी वायदे बाजारावर कर लादण्याचे जे पाऊल उचलले आहे त्यामागील अधाशीपणा स्पष्ट होतो. परिवर्तनशील आणि तरंगत्या वायदे बाजारात शेतीमधील पतपुरवठा आणि गुंतवणूक यासंबंधी समस्या सोडविण्याची क्षमता आहे हे अर्थमंत्र्यांना ठाऊक नसेल असे नाही. वंशविच्छेदच वाटावा अशा दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या रेट्यामुळेच, अर्थमंत्र्यांनी कर्जमाफी योजनेच्या रूपाने ज्या काही भावना व्यक्त केल्या तसे करणे भाग पडले. त्यांना काहीतरी करणे भागच होते. अर्थातच, त्यांनी शेवटच्या घटकेला घाईघाईत, शेतीकर्जासंबंधी सांख्यिकीचा काळजीपूर्वक आढावा न घेता एक 'पॅकेज' तयार केले. कर्जमाफीच्या ६०,००० कोटी रुपयांच्या दाव्यावर विविध क्षेत्रांतून अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. विश्वनाथ प्रतापसिंगांच्या पंतप्रधानकीच्या काळातील १०,००० रुपयांच्या कर्जमाफीच्या वेळी बँकांनी आपली जबरी वसुलीची क्षमता वापरून आपली स्थिती सुधारून घेतली होती. राजकीय फायदा डोळ्यांसमोर ठेवून बँकांच्या त्या प्रवृत्तीला पोषक व्हावे या दृष्टीने हा आकडा फुगवला असावा असे दिसते.

 त्यांचे मार्गदर्शक आणि पूर्वज अर्थमंत्री सध्याचे पंतप्रधान यांच्याप्रमाणेच अर्थतज्ज्ञ हे अत्यंत बिलंदर राजकारणीही असू शकतात हेच चिदंबरम् यांनी या कर्जमाफी योजनेच्या मार्गाने सिद्ध केले आहे. कर्जमाफीच्या या रणात जे जे पक्ष आणि संस्था त्याचे श्रेय लाटण्यासाठी उतरले त्या सर्वांच्या आशा अर्थमंत्र्यांनी एका फटक्यात धुळीस मिळवल्या. त्याचबरोबर, एवढ्या मोठ्या संख्येने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्पर्धक म्हणून पुढे येण्याची भीती असलेल्या अराजकीय शेतकरी चळवळीलाही शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याच्या चालीने निष्क्रिय केले आहे.

बळिचे राज्य येणार आहे / २४६