पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/232

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असेल; पण 'मुळात शेती तोट्याची आहे' असे वाक्य काही त्यांच्या मुखातून निघाले नाही. याउलट, काही काळापूर्वी, त्यांनी 'शेती फायद्याची असते; आपल्या बारामतीच्या शेतीत आपण अठरा एकरांत अठरा लाखाचे उत्पन्न काढतो' असे सांगितले होते. त्यांचे हे म्हणणे खरे असेल तर शेती कशी करावी याबद्दल शेतकऱ्यांना सल्ला देऊन बारामतीला आपण आपल्या शेतीत कोणती आणि किती खते औषधे वापरतो, कोणती बियाणी वापरतो आणि काय किमया करतो की ज्यामुळे आपल्याला दर एकरी एक लाख रुपये फायदा मिळू शकतो याचे रहस्य शेतकऱ्यांना उलगडून दाखविले असते तर, 'शेतकऱ्यांनो, शेती सोडा' असा सल्ला देण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती.
 बरे, 'शेतकऱ्यांनी शेती सोडावी' असा सल्ला देताना किती शेतकऱ्यांनी शेती सोडावी याचा काही त्यांनी उल्लेख केलेला नाही. सर्वच शेतकऱ्यांनी शेती सोडावी असे सांगितले तरी ते ऐकणार नाहीत आणि त्यांनी ते ऐकले तर देशातील सर्व लोकांचे पोट कसे भरावे यासंबंधीची काही तरतूद त्यांनी योजिली असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे होती. तसे त्यांनी काही सांगितलेले नाही.
 यापलीकडे, शेतकऱ्यांनी शेती सोडून द्यावी तर मग शेतकी मंत्रालयाचे प्रयोजन काय उरते? शेतकऱ्यांनी शेतकी जशी गुंडाळून ठेवायची तसेच शेतकी मंत्रालयही गुंडाळून ठेवले पाहिजे असा काही उल्लेख त्यांनी केलेला नाही. उलट, शेतकी मंत्रालयाचे अंदाजपत्रकी स्थान टिकून कसे राहील एवढेच नव्हे तर, ते वाढेल कसे याचाच विचार ते करताना दिसतात.
 पवारसाहेब शेतकीमंत्री झाले तेव्हा महाराष्ट्रातील शहरोशहरी, गावोगावी, रस्तोरस्ती खांबाखांबांवर 'शेतकऱ्यांचा जाणता नेता शेतकीमंत्री झाला' अशा जाहिराती फडकल्या होत्या. शेतकऱ्यांचा जाणता नेता शेतकीमंत्री झाला आणि गेल्या तीन वर्षांत, हिंदुस्थानातील शेतकऱ्यांमध्ये, नैराश्यापोटी वैफल्याने आत्महत्या करण्याची एकच लाट उसळली आणि शेवटी, साहेबच आता 'शेतकऱ्यांनो, शेती सोडा' असा सल्ला देऊ लागले आहेत; पण हे सांगताना ही अशी वेळ का आली, शेती तोट्याची का झाली, शेतकरी कर्जबाजारी का झाला हे सांगायची तसदी काही त्यांनी घेतलेली नाही.

 तसे, 'शेती सोडा' हा सल्ला शरद पवार आणि त्यांचे साथीदार शेतकऱ्यांना अनेक वर्षे देतच आहेत. पहिल्यांदा, शेती जमत नसेल तर शेतकऱ्यांनी गाई पाळाव्या, म्हशी पाळाव्या, दुग्धव्यवसाय करावा असा सल्ला देऊन झाला.

बळिचे राज्य येणार आहे / २३४