पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/229

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झुकवतात. परिणामत:, दीडशेच्यावर जिल्ह्यांत आज नक्षलवाद्यांचे राज्य चालू आहे.
 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे स्वातंत्र्य खरे नाही या रणदिवे सिद्धांतातून तेलंगण आणि बंगाल येथे उठाव चालू झाले. रणदिवे सिद्धांताचा चौथा हिस्सा तरी विजय झाला आहे. केंद्रात डाव्यांना 'नकाराचा अधिकार' मिळाला आहे.
 भारताच्या फाळणीच्या वेळी 'हँस के लिया पाकिस्तान, लड के लेंगे हिंदुस्तान' असे म्हणणाऱ्यांचाही चौथा हिस्सा विजय झाला आहे आणि इस्लामचे राज्य झाले नसले तरी 'हिंदुत्व नित्य जगती अवमानितात' अशी परिस्थिती तयार होत आहे. याला जबाबदार कळपवादी हिंदू नेतृत्व की राजकारणधुरंधर व हिंदू समाजातील असंतुष्ट आणि मुसलमान यांच्या मतांची बेरीज करून आवश्यक तर राष्ट्रहितही बाजूस ठेवण्यास तयार असलेले हा विषय महत्त्वाचा नाही. ग्रमीण भागात घुसलेला वर्गवाद काढून जमीनमालक आणि भूमिहीन या दोघांचाही फायदा करून देणारी विचारसरणी बाजूस सारून गावागावांत जातीयवादाच्या आधाराने 'आहे रे' आणि 'नाही रे' अशी, संघर्ष पेटवून देणारी विचारसरणी यशस्वी होत आहे.
 समाजवादी धोरणांचा वरवंटा सगळ्यात क्रूरपणे फिरला तो शेतकऱ्यांवर; पण, लायसन्स-परमिट-इन्स्पेक्टर राज्य फक्त शेतीपुरते मर्यादित नव्हते. व्यापार, उद्योग क्षेत्रांचेही नियोजनव्यवस्थेने वाटोळे केले. श्री. नरसिंहराव यांच्या जमान्यात आर्थिक सुधारांची सुरुवात झाली. त्यात बिगरशेती क्षेत्रातील आर्थिक सुधारांना प्राधान्य दिले गेले. शेतकऱ्यांनाही व्यवसायस्वातंत्र्य असावे अशी शेतकरी संघटनेची धडपड चालू असताना बिगरशेती क्षेत्रातही आर्थिक सुधारणांचा विरोध करणाऱ्या नेता-तस्कर-गुंडा-अफसर यांनी उचल खाल्ली आहे आणि आपल्या युनियनच्या ताकदीवर संप हरताळांचे हत्यार वापरून संपुआ सरकारला जागोजाग नमवण्यास ते यश मिळवत आहेत. परकीय गुंतवणुकीची टक्केवारी, भविष्य निर्वाह निधीचा व्याजाचा दर अशा प्रश्नांवरही डाव्यांचा आग्रहच निर्णायक ठरतो. शेतीक्षेत्रात तर शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा विषयपत्रिकेवरूनच संपवण्यात आला आहे. अन्न आणि खते यांच्यावरील अनुदानाचा गवगवा वाढत आहे. गावागावांत वर्गयुद्ध पेटवण्याचे मनसुबे रचले जात आहेत.

 जालना येथे शेतकरी संघटनेचे अधिवेशन बोलावण्यात आले ते या विपरित परिस्थितीत. शेतकरी आंदोलनाच्या झेंड्याखालील दुसऱ्या स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या अरिष्टात सापडत आहे. इकडे आड, तिकडे विहीर - पाणी

बळिचे राज्य येणार आहे / २३१