पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/226

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आघाडीला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. एवढेच नव्हे तर, अपूर्व आर्थिक विकासाचा एक कालखंड प्रत्यक्षात आणून भारत जागतिक महासत्ता होऊ शकतो असे स्वप्न राष्ट्रापुढे उभे केले. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या काळातही हिंदू समाजाला कळपवादी बनवू पाहणाऱ्यांनी अतिरेकी प्रकार घडवून आणले त्यातून वाजपेयींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव झाला.
 या पराभवातून यथोचित अर्थ काढण्याऐवजी कळपवादी हिंदू, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आमच्यापासून हिंदुत्व दूर केल्यामुळे तिचा पराभव झाला व पुन्हा सत्तेवर यायचे असेल तर प्रखर हिंदुत्वाचा ध्वज उभारला पाहिजे असा गिल्ला करीत आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रगल्भ सर्वसमावेशक आणि सहिष्णू धोरणामध्ये एक इतिहाससिद्ध हिंदू मानसिकतेचा कल होता. संख्याशास्त्रीय दृष्टीने पाहिले तर भारतीय मनाचा तोच सुवर्णमध्य आहे. कळपवादी हिंदुत्वाच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे विरोधी काँग्रेस आघाडीस प्रचाराचा झंझावात उठवण्याची संधी मिळाली आणि परदेशी जन्माच्या नेतृत्वालासुद्धा जनतेने पत्करले. 'अल्पसंख्याकांची मुजोरी चालेल पण बहुसंख्याकांची हुकूमशाही नको.' अशा भावनेने लोकांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीस मागे टाकले.
 काँग्रेस निर्धार्मिक कधीच नव्हती. अल्पसंख्याकांच्या धास्तीला खतपाणी घालून आणि त्याहीपेक्षा हिंदू प्रवक्त्यांच्या विरुद्ध जहरी प्रचाराची राळ उठवून काँग्रेसने निर्धार्मिकतेचा कांगावा चालवला आहे त्याला जनतेने पत्करले.
 परिणाम असा झाला की ढोंगी निर्धार्मिक काँग्रेस, मागास (मंडल) वर्गीय जाती किंवा अल्पसंख्याक यांच्या एकीच्या मतांची बेरीज यशस्वीपणे करून दाखवणारे भ्रष्टाचारी, मंडलजातीयवादी आणि खुल्या व्यवस्थेला सर्व आघाड्यांवर विरोध करणारे डावे कम्युनिस्ट यांचे राज्य दिल्लीत प्रस्थापित झाले आहे.
 राज्यसभेचा सदस्य म्हणून वेगवेगळ्या प्रसंगी अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर, दारिद्र्यनिर्मूलनासंबंधात वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांची भाषणे ऐकण्याचा योग आला. त्यापलीकडे त्यांची शरीराची भाषाही पाहता आली. त्यांच्या एकमेकांच्या नेत्रपल्लव्या आणि खाणाखुणा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर माझी भावना झाली ती अशी:

 लालूप्रसादसारखे मागासवर्गीय नेते काय, डावे काय आणि काँग्रेसवाले काय - सगळ्यांच्या मनात हिंदुत्वाबद्दल मोठी चीड आहे. देशासाठी कोणतीही

बळिचे राज्य येणार आहे / २२८