पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/225

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १९८० साली शेतकरी संघटनेचा उदय झाला तेव्हा शासन आणि नियोजित अर्थकारण यांच्यावर डाव्या विचारांचा प्रभाव होता. गावागावातील छोटे मोठे शेतकरी यांच्यातील वादच प्रकर्षाने मांडून जमिनीच्या फेरवाटपाला अग्रहक्क दिला जात होता. जमीनधारक शेतकरी म्हणजे भांडवलदार; शोषण होते ते केवळ भूमिहीन मजुरांचे अशी मांडणी २५ वर्षांपूर्वी केली जात होती. शेतकरी संघटनेने या डाव्या विचारांशी संघर्ष केला. शेतकरी संघटनेने 'शेतीवर ज्याचे पोट तो शेतकरी' अशी व्याख्या सुस्थापित केली. 'शेतकरी तितका एक एक' ही मानसिकता रुजवली. शेतकऱ्यांच्या दारिद्रयाचे आणि कर्जबाजारीपणाचे मूळ कारण 'इंडिया'चा वसाहतवाद आहे, शेतीमालाला भाव मिळू न देण्याचे धोरण हे शेतकऱ्यांच्या गरिबीचे मूळ आहे असे मांडले आणि जगापुढे सिद्ध करून दाखवले. 'भीक नको, हवे घामाचे दाम' अशी सन्मानजनक भावना शेतकऱ्यांच्या मनात रुजवली. शेतकरी संघटनेच्या कर्जमुक्ती आणि भ्रष्टाचारविरोधी 'उसने पैसे परत मिळविणे' या आंदोलनांनी तर 'मी कर्जबाजारी शेतकरी आहे याचा मला अभिमान आहे' असे धाष्टर्याने म्हणण्याइतपत आत्मविश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण केला.
 या मांडणीवर शेतकरी आंदोलन उभे राहिले, देशात चौदा राज्यांत पसरले. वर खाली चढउतार झाले पण २५ वर्षानंतरही शेतकरी आंदोलन झेंडा धुळीत पडू देत नाही; उलट, शेतकरी संघटनेची आर्थिक मांडणीच आता जगमान्य झाली आहे. हे इतिहासातील अपूर्व यश शेतकरी संघटनेने मिळवले; परंतु हे सर्व यश राजकीय उलथापालथीत वाहून जाण्याचा धोका तयार झाला आहे.

 सर्व देशात हिंदू म्हणवले जाणारे लोक बहुसंख्य ; पण हिंदू तत्त्वज्ञानाची परंपरा व समाजाची मानसिकता ही व्यक्तिनिष्ठ आहे. 'पिंडात्मा आणि ब्रह्मात्मा यांच्यामध्ये कोणीही मध्यस्थ किंवा ग्रंथ नाही' असे मानणाऱ्या उदारमतवादी हिंदू समाजाच्या नेतृत्वाची पताका त्या तत्त्वज्ञानातील देदीप्यमान विचारांचा लोप करून बाहेरून हिंदुस्थानवर आक्रमण करून यशस्वी झालेल्या आणि संघशक्ती मानणाऱ्या देशांतील इतर समाजांचा आदर्श पुढे ठेवून हिंदू समाजाला बळजबरीने संघधर्म बनवणाऱ्यांच्या हातात गेली. हे पताकाधारी गर्जना करतात हिंदुत्वाची पण उदारमतवादी हिंदू त्यांना मानत नाही. हिंदुत्वाच्या घोषणेने भारतीय संघराज्याच्या संसदेत दीडदोनशे जागा मिळवता येतात पण बहुमत मिळवता येत नाही. यासाठी इतर समाजांना न दुखावता बरोबर घेऊन चालणे आवश्यक आहे हे अटलबिहारी वाजपेयी यांनी हेरले आणि राष्ट्रीय लोकशाही

बळिचे राज्य येणार आहे / २२७