पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/220

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


जलना, जलाना, जालना



 शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी व शेतकरी युवा आघाडी या सर्व संघटनांचे संयुक्त अधिवेशन २७ ते ३० जानेवारी २००५ असे चार दिवस मराठवाड्यातील जालना येथे होणार आहे.
 शेतकरी संघटना ही आंदोलक संघटना आहे. तिची कोणतीही लिखित घटना नाही. इंग्लंडमधील लोकसभेप्रमाणे कोणतीही लेखी घटना नसताना प्रदीर्घ काळ ऐतिहासिक कार्य करून दाखवणारी शेतकरी संघटना ही एक अनन्यसाधारण चळवळ आहे. घटना तयार करण्याचा प्रयत्न झाला नाही असे नाही; पण आंदोलक स्वरूप घटनेत उमटले तर ते धर्मादाय आयुक्तांना चालत नाही आणि नुसतेच 'समाजवादी' असे स्वरूप दाखवणारी घटना शेतकऱ्यांच्या मनात भावत नाही. अशा पेचामुळे आजही संघटनेला लिखित घटना नाही. परिणामतः, शेतकरी संघटनेनंतर उमललेल्या शेतकरी महिला आघाडी (नोव्हेंबर १९८६) आणि शेतकरी युवा आघाडी (जानेवारी २००२) यांनाही लिखित घटना नाही. शेतकरी संघटनेचे जालना येथे होणारे अधिवेशन हे दहावे अधिवेशन आहे.

 अलिखित परंपरेने शेतकरी संघटनेची एक बांधणी आहे. संघटनेचा एक अध्यक्ष असतो. तो अध्यक्ष एक कार्यकारिणी नेमतो, जिल्हा व तालुका पातळीवर आवश्यकतेप्रमाणे पदाधिकारी नेमतो. संघटनेने प्रथमपासून रस्ता, पाणी आणि वीज यासंबंधीचे प्रश्न स्थानिक मानले आहेत. या प्रश्नासंबंधीची आंदोलने किंवा कार्यवाही जिल्हा किंवा तालुका संघटनांनी चालवायची असतात. रस्ता, पाणी आणि वीज या सर्वच विषयांत 'भारत' आणि 'इंडिया' यांच्यामध्ये एक खाई आहे. ही खाई इंडिया-भारत यांच्यामधील नववासाहतिक संबंधांचा एक दुय्यम परिणाम आहे. मुख्य प्रश्न शेतीमालाच्या किफायतशीरपणाचा

बळिचे राज्य येणार आहे / २२२