पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/200

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अमेरिकेच्या आम जनतेची जाण हा या कार्यक्रमांतील अमेरिकेच्या प्रत्येक यशस्वी सहभागाचा गाभा असणार आहे; त्यात राजकीय अभिनिवेशाला किंवा पूर्वग्रहाला वाव असणार नाही.
 इतिहासाने आपल्या राष्ट्रावर ही जी जबाबदारी सोपविली आहे ती आम अमेरिकन जनतेच्या त्या जबाबदारीला सामोरे जाण्याच्या मनीषेच्या बळावर, मी आतापर्यंत ज्या काही अडचणी आपल्यासमोर ठेवल्या त्यांवर मात करून पार पाडू शकू आणि पार पाडू.
 जनरल मार्शल यांच्या या भाषणानंतर लवकरच 'युरोपीय आर्थिक सहकार परिषदे'ची स्थापना झाली. तिच्या चर्चासत्रांनंतर 'युरोपीय आर्थिक सहकार संघ' स्थापन झाला. त्यांनी जनरल मार्शल यांच्या अपेक्षेनुसार करारनामा केला आणि युरोपीय राष्ट्रांच्या आर्थिक पुनरुत्थानाचा कार्यक्रम सुरू झाला. समाजवादी रशियाने या कार्यक्रमात भाग न घेण्याचे दडपण त्यांच्या गटातील युरोपीय राष्ट्रांवर आणले. १९४८ साली सुरू झालेल्या या आर्थिक सहकाराच्या कार्यक्रमात अमेरिकेने युरोपीय राष्ट्रांना डिसेंबर १९५१ पर्यंत १३३० कोटी डॉलर निधी पुरवला.
 महायुद्धाने सर्वतः उद्ध्वस्त झालेली जी युरोपीय राष्ट्रे या कार्यक्रमात सहभागी झाली ती आज जगाच्या नकाशात प्रगत राष्ट्रे म्हणून ओळखली जातात.
 (५ सप्टेंबर १९४७ रोजी हार्वर्ड विश्वविद्यालयात जनरल मार्शल यांनी केलेल्या भाषणाचे मराठीकरण) (शेतकरी संघटक, ६ एप्रिल २०००)

बळिचे राज्य येणार आहे / २०२