पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/199

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपूर्ण युरोप क्षेत्रातील चलनांच्या प्रचलित मूल्यांबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही; पण युरोप खंडातील सर्व उत्पादक आणि शेतकरी आपल्या मालांची देवाणघेवाण या चलनांच्या माध्यमातून करण्यास राजी होतील अशी परिस्थिती तयार व्हायला हवी.
 या सर्व परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर निरुत्साहाचे वातावरण तयार होईल आणि त्या निरुत्साहातून आलेल्या अगतिकतेमुळे दंगेधोपे उसळण्याची शक्यता आहे; पण त्याबरोबरीनेच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे काय परिणाम होतील तेही आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. जगाचे आर्थिक स्वास्थ्य चांगलेच राहायला हवे, त्याशिवाय समाजात स्थैर्य आणि शांतता नांदू शकणार नाही. त्यामुळे, जागतिक आर्थिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अमेरिकेने शक्य तितकी मदत करणे तर्कसंगतच होईल. आपली धोरणे कोण्या राष्ट्राविरुद्ध किंवा विचारसरणीविरुद्ध नाहीत; आपली धोरणे भूक, गरिबी, वैफल्य आणि अव्यवस्था यांच्याविरुद्ध आहेत. स्वतंत्रतावादी संस्थांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही अशा प्रकारच्या जागतिक अर्थव्यवस्थेची पुनर्स्थापना करणे हा आपल्या धोरणांचा उद्देश असला पाहिजे आणि माझी खात्री झाली आहे की मदतच करायची झाली तर वेगवेगळ्या समस्या उभ्या राहिल्या की त्या त्या वेळी तुकड्या तुकड्याने मदत करण्याचा काही उपयोग होत नाही. सरकारने यापुढे मदत करायची ठरवली तर ती वरवरच्या मलमपट्टीप्रमाणे न करता समस्येचे पूर्णांशाने निराकरण करणारी असावी. ज्या राष्ट्रांच्या सरकारांना आपल्या अर्थव्यवस्थेची पुनर्स्थापना करण्याची मनापासून तळमळ आहे त्यांना अमेरिकेच्या सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळेल असा मला विश्वास वाटतो. इतर राष्ट्रांच्या आर्थिक सुधारणांच्या प्रयत्नांना अडथळे आणून त्यांना खो घालण्याचे उपद्व्याप करणाऱ्या राष्ट्रांना मात्र आमच्याकडून अशी मदतीची अपेक्षा करता येणार नाही. त्यापुढे जाऊन, जी सरकारे, राजकीय पक्ष आणि गट राजकीय किंवा इतर फायद्यांसाठी मानवी समाजात दुर्दशा निर्माण करणाऱ्या कारवाया करतील त्यांना अमेरिकेच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागेल.
 युरोपीय राष्ट्रांच्या समस्येचे निराकरण करणाऱ्या आणि त्यांना आपल्या अर्थव्यवस्थेची पुनर्स्थापना करण्याच्या प्रयत्नांत मदत करणाऱ्या या योजनेत अमेरिका सरकारने सहकार्याची फार पुढची पावले टाकण्याआधी युरोपीय राष्ट्रांमध्ये, साहजिकपणे, एक करार होणे आवश्यक आहे. या करारात अमेरिकेची जी काही योजना असेल त्या योजनेकडून प्रत्येक राष्ट्राची अपेक्षित मागणी आणि योजना अमलात आणण्यासाठी त्यांचा सहभाग याविषयी स्पष्टता असली पाहिजे. युरोपला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अमेरिकेने एकतर्फी एखादी योजना आखून ती त्यांच्यावर लादणे योग्य होणार नाही आणि फलदायीही ठरणार नाही. ते युरोपियनांचे काम आहे. तेव्हा, माझ्या मते, पुढाकार युरोपियनांनीच घ्यायला हवा. आमच्या देशाची भूमिका युरोपियनांना त्यांच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात मित्रत्वाच्या भावनेतून मदत करणे आणि नंतर ती अमलात आणण्यासाठी प्रत्यक्षात शक्य होईल तितके आर्थिक पाठबळ देणे इतकीच राहील. हा कार्यक्रम सामुदायिक असायला हवा; सगळी नाही तरी युरोपातील बरीच राष्ट्रे यात सामील झाली पाहिजेत.

 एकूण समस्येचे स्वरूप आणि तिच्या निराकरणासाठी केलेली उपाययोजना यासंबंधी

बळिचे राज्य येणार आहे / २०१