पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बिघडली. स्वैर आणि विघातक नाझीशाहीखाली अक्षरश: प्रत्येक उद्योग जर्मन युद्धयंत्रणेचा भाग बनवला गेला. भांडवलाची हानी, राष्ट्रीयीकरणात गडप होणे किंवा सरळसरळ विद्ध्वंस यांमुळे दीर्घकालीन व्यापारी संबंध, संस्था, बँका, विमा कंपन्या आणि जहाज कंपन्या नामशेष झाल्या. बऱ्याच राष्ट्रांमध्ये, स्थानिक चलनावरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे. युद्धकाळात युरोपमधील उद्योगांची मांडणी पूर्णपणे मोडून पडली. लढाया संपून दोन वर्षे उलटली तरी जर्मनी आणि ऑस्ट्रियाबरोबर शांतता करार होऊ न शकल्याने नुकसानीतून वर येण्याची गती गंभीरपणे कमी कमी होत आहे; पण या सर्व समस्यांतून सुटण्यासाठी काही तातडीचा तोडगा निघाला तरी युरोपातील अर्थकारणाची घडी नीट बसवायची तर आधी वाटत होते त्यापेक्षा बराच अधिक कालावधी आणि प्रयत्न आवश्यक आहेत.
 या बाबीची आणखी एक बाजू आहे लक्षणीय आणि गंभीरही. शेतकरी नेहमी आपल्या इतर गरजा भागविता याव्या म्हणून शहरवासीयांबरोबर विनिमय करण्यासाठी अन्नधान्य पिकवितो. ही श्रमविभागणी आधुनिक संस्कृतीचा पाया आहे. या घडीला हा पायाच उखडला जाण्याची भीती तयार झाली आहे. छोट्या मोठ्या शहरांतील उद्योग शेतकऱ्याला पुरेशा वस्तूंचे उत्पादन करीत नाहीत. कच्चा माल आणि इंधनाचा पुरवठा अपुरा आहे. यंत्रसामुग्रीची कार्यक्षमता कमी झाली आहे किंवा ती मोडीतच निघाली आहे. शेतकरी किंवा जमीनदार यांना जो माल खरेदी करण्याची इच्छा आहे तो विक्रीसाठी उपलब्धच नाही. त्यामुळे हाती आलेला पैसा काहीच उपयोगाचा ठरत नसल्याने शेतात पिकवलेला माल बाजारात नेऊन विकण्याचा खटाटोप त्याला बिनफायद्याचा वाटू लागला आहे. त्यामुळे, त्याने बरीच जमीन पिकांखालून काढून त्यांत गुरे चारायला सुरुवात केली आहे. कपडेलत्ते आणि आधुनिक संस्कृतीस साजेशी यंत्रेउपकरणे त्याच्याकडे नसली तरी शेतकरी आपल्या जनावरांना जादा धान्य खाऊ घालतो आणि त्याला व त्याच्या कुटुंबीयांनाही पुरून उरण्याइतके अन्न त्याच्याकडे आहे. इकडे, शहरातील लोकांना अन्न आणि इंधनाचा तुटवडा पडू लागला आहे. त्यामुळे राष्ट्राराष्ट्रांच्या सरकारांना आपल्याकडील परकीय चलन आणि आपली पत खर्चुन परदेशातून अन्न आणि इंधन विकत आणून शहरी लोकांच्या गरजा पुऱ्या करणे भाग पडत आहे. जी गंगाजळी पुनर्बाधणीच्या तातडीच्या कामासाठी वापरायची तीच अशा तऱ्हेने आटून चालली आहे. अशा तऱ्हेने एक गंभीर समस्या वेगाने आकार घेत आहे, ही जगाच्या दृष्टीने शुभसूचक घटना निश्चितच नाही. उत्पादनांच्या विनिमयाला आधारभूत असणारी श्रमविभागणीची आधुनिक प्रणाली मोडून पडण्याच्या धोक्यात सापडली आहे.
 यातील सत्य परिस्थिती अशी आहे की येत्या तीन-चार वर्षांत युरोपला लागणाऱ्या परदेशी - प्रामुख्याने अमेरिकन - अन्नधान्ये आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती त्याच्या सध्याच्या आर्थिक क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळायला हवी किंवा अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय ऱ्हासाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल.

 हे दुष्टचक्र भेदणे आणि युरोपीय राष्ट्रांच्या तसेच समग्र युरोपच्या आर्थिक भवितव्याबद्दल त्यांच्या जनतेत आत्मविश्वास पुनर्प्रस्थापित करणे हाच या परिस्थितीवरील तोडगा आहे.

बळिचे राज्य येणार आहे / २००