पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारीही इतके लालची होते की जमीनदारांनासुद्धा जगणे मुश्किल होऊन बसले. इंग्रज अधिकाऱ्यांच्या जुलुमातून सुटण्याच्या आशेने जमीनदार १८५७ च्या बंडात बऱ्याच मोठ्या संख्येने सामील झाले होते. बंड टिकू शकले नाही कारण बंडात सामील झालेले राजे, जमीनदार सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळवू शकले नाहीत. बंड मोडले, राणीचे राज्य आले आणि बंडात सामील झालेल्या जमीनदारांना कठोरपणे नेस्तनाबूत करण्यात आले. त्यांच्या जागी, इंग्रजांना मदत करणाऱ्या लोकांना जमीनदारी देण्यात आली. नवीन जमीनदारांचा हा वर्ग एक खास रूप घेऊन आला. सर्वसामान्य जनता इंग्रजांविरुद्ध बंडामध्ये सामील झाली नाही हे खरे; पण खानदानी जमीनदारांच्या विरुद्ध इंग्रजांचे पित्ते बनून उभे राहिले म्हणून नव्याने जमीनदारी लाभलेल्या या महाभागांमध्ये रयतेच्या मनात कमालीची घृणा होती. या नव्या जमीनदारांसमोर खानदानाची इज्जत सांभाळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे त्यांच्या कारभारावर कसल्याच नैतिकतेचे बंधन नव्हते. शेतकरी आणि शेतमजुरांच्या हातून जितके जमेल तितके पीक ओरबाडून घेणे, मौजमजा व ऐषआरामात धनसंपत्ती उडविणे आणि आपले हे भाग्य अखंड राहावे यासाठी शक्य तितक्या तऱ्हांनी सरकारी अधिकाऱ्यांना खूष ठेवणे असे या नवीन जमीनदारांचे जीवन झाले होते.
 देशामध्ये इंग्रजी न्यायालये चालू होण्याआधी गावची कोणतीही पंचायत काही सामाजिक अपराधासाठी एखाद्याला जातिबहिष्काराची शिक्षा देऊ शकत असे, पण कोणाला गावाबाहेर हाकलू शकत नसे.
 आता जमीनदारांना न्यायालयांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेणे शक्य होऊ लागले. जमीनदारांनाही पैशांची गरज नेहमी भासे.सरकारी महसूल भरण्यासाठी सद्वर्तनी जमीनदारांनाही कर्ज काढावे लागे. बाकी साऱ्या जमीनदारांना ऐषआरामासाठी रयतेची पिळवणूक करूनसुद्धा पैशाचा खणखणाट भासत असे. सावकारांना आणि व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करणारांना महत्त्व प्राप्त झाले आणि ते स्वत:च एक ताकद बनले.

 इंग्रजांच्या आगमनानंतर कंपनीविरुद्ध जमीनदारांनी उभे केलेले बंड म्हणजे शेतकरी चळवळच होती- जमीनदारांनी केलेली- चळवळ ; पण जमीनदारांबद्दल थोडाबहुत आदर राखून असली तरी रयत त्यावेळी इंग्रजांच्या विरोधात उभी ठाकली नाही. शेतकरी-अस्मिता भंग पावली. गाव एकक घटक राहिला नाही. आता शेतकरी चळवळ सरकारविरोधी स्वरूपाची न राहाता गावकुसाच्या आत मर्यादित झाली आणि मग कुठे सावकारांच्या विरोधात तर कुठे जमीनदारांच्या

बळिचे राज्य येणार आहे / १९२