पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असं की, असंतुलित विकासामुळेच विकास होऊ शकतो, संतुलित विकास अशी काही गोष्टच नसते. म्हणजे काही लोकांना तुम्ही एकदम खूप चढवून दिलं तर ते आपल्या मागोमाग बाकीच्या लोकांना ओढत नेतात आणि सगळ्या देशाचा विकास होतो.

 फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधी अशाच तऱ्हेचं तत्त्वज्ञान मार्केस् द सेंटने मांडलं होतं; की काही लोक प्रचंड श्रीमंतीत असले तर बाकीचा देश हा श्रीमंत होऊ शकतो. हर्षमनने असं मत मांडलं की शेतकरी हा अडाणीच असतो, त्याच्या शेतीमालाला भाव देण्याची काही आवश्यकता नाही. शेतीमालाला भाव दिल्यानं तो आपलं उत्पादन वाढवत नाही का कमी करत नाही. एखादं गाढव जसं त्याच्यासमोर गूळ ठेवला काय किंवा चिंधी ठेवली काय ते सारख्याच चवीनं चघळतं तसं कमी किमती द्या का जास्त किमती द्या, प्रत्येक शेतकरी त्याच्याकडे जी काही शेती असेल, त्याच्याकडे जी काही खतं असतील, मुतं असतील, औषधं असतील, बियाणी असतील ती साधनं वापरून जितकं जास्तीत जास्त उत्पादन काढता येईल तितकं तो काढतोच. त्याला काही मिळो का न मिळो आणि जर का विकास घडवून आणायचा असेल तर अशा शेतकऱ्याला शेतीमालाचा भाव देण्यापेक्षा त्याला आपण जमीन देऊ, पाणी देऊ, बियाणी देऊ, खतं देऊ, औषधं देऊ आणि शेतीमालाचे भाव कमी ठेवू. शेतीमालाचे भाव कमी ठेवले म्हणजे कारखान्यात कच्चा माल स्वस्त मिळेल, कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांना जास्त मजुरी देण्याची गरज पडणार नाही आणि एका बाजूला उत्पादनही वाढेल आणि दुसऱ्या बाजूला कारखानदारीकरता लागणारे भांडवल स्वस्त कच्चा माल आणि स्वस्त धान्य या स्वरूपात उपलब्ध होईल. हर्षमन हा भारत सरकारचा नियोजनाचा अधिकृत सल्लागार होता आणि नेहरू काळामध्ये धरणं बांधावीत, त्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं पण फारसं काही आधुनिक तंत्रज्ञानात जाऊ नये. कारण आधुनिक तंत्रज्ञानात जायचं म्हणजे शेतीमध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं आवश्यक आहे, मग सहकारी शेती करावी, अशी मांडणी केली गेली. हिंदुस्थानातला भांडवली व्यापारी वर्ग आणि तथाकथित समाजवादी तत्त्वज्ञान यांची गाठ कशी पडली. पाहा! सगळ्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये समाजवादाचं नाव कुणी काढलेलं नव्हतं. गांधीजींनी ४२ मध्ये येरवड्याच्या तुरुंगामध्ये मार्क्सचं पुस्तक पहिल्यांदा वाचलं. त्यांनी मत दिलं, 'जर हे पुस्तक मी लिहिलं असतं तर जास्त चांगलं लिहिलं असतं.' स्वातंत्र्याच्या चळवळीच्या नेत्याची

बळिचे राज्य येणार आहे / २१