पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मदतीच्या साहाय्याने अत्यंत आनंदात मौजमजेत जीवन जगत असतो असे चित्र ते उभे करतात. मध्यमवर्गीयांच्या मनांत शेतकऱ्यांबद्दल शत्रुत्वाची भावना असते हे एकवेळ समजण्यासारखे आहे; पण मागास समाजातील शेतकऱ्यांबद्दल विद्वेष का असावा? गावच्या शेतमजुराचा संबंध स्वतःच्या नावावर जमीन ठेवणाऱ्या शेतकऱ्यांशीच येतो. त्यांना काम मिळत नाही. याला, ते ज्यांच्या शेतावर काम करतात ते जमीनमालक जबाबदार नसून शेतकऱ्यांच्या शोषणाचे षड्यंत्र रचून ते चालविणारे, दूर शहरात राहणारे जबाबदार आहेत हे त्यांना समजत नाही. गावच्या गरिबीची झळ सर्वात अधिक शेतमजुरांनाच सोसवी लागते. त्यांना गावात जगणे अशक्य होऊन जाते. विशेषत: दुष्काळाच्या वर्षी त्यांना गाव सोडून जाणे भाग पडते. मग ते शहरात येऊन झोपडपट्ट्या, गलिच्छ वस्त्या किंवा फुटपाथवर येऊन राहतात आणि गावातील भुकेकंगाल अवस्थेपेक्षा तेथील हलाखीचे जीवनसुद्धा ते बरे मानून घेतात. गावी राहिलेल्या शेतकऱ्यांबद्दलच्या कडवट आठवणी फक्त त्यांच्या मनात शिल्लक राहतात. शेतीमालाला रास्त म्हणून वाढीव भाव मिळाला तर त्याचा सर्वात जास्त भार त्यांनाच सोसावा लागणार असतो. म्हणून ते शेतकरी चळवळीच्या विरोधात उभे राहतात.

 आपल्या देशातील शेतकरी चळवळीचा स्वभाव समजून घ्यायचा तर येथील इतिहासाची ओळख करून घेणे आवश्यक आहे. पूर्वी जगभर, अन्नधान्याचे उत्पादन करणारे शेतकरी आणि त्यांचा उपभोग घेणारे बिगरशेतकरी यांच्यामधील संघर्षाची सुरुवात दाहकच झाली; पण हळूहळू संघर्ष निवळत गेले. शेतकऱ्यांकडून लुटलेल्या संपत्तीचा वापर फौजेचा खर्च, महालवाडे बांधणे, मंदिरे उभारणे, दरबारी मौजमजा इत्यादींसाठी होत असे तोपर्यंत उत्पादक शेतकरी आणि उपभोक्ता समाज झगडत राहिले. जमिनीतून पिकविलेल्या अन्नधान्यांच्या कोठारांचा वापर उत्पादन वाढविण्याकरिता आर्थिक योजनांमध्ये व्हायला लागला तेव्हापासून संघर्ष मावळत गेला. भांडवलादी व्यवस्थेने, भारत वगळता जगातील सर्व देशांतील शेती व बिगरशेती समाजातील दरी बऱ्याच प्रमाणात कमी केली. भारतात भांडवलवाद आलाच नाही, जातीव्यवस्थेचाच प्रभाव चालू राहिला आणि म्हणूनच भारतातील शेतकऱ्यांपुढील समस्या इतर देशांतील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या तुलनेत खूप वेगळ्या आहेत. आपल्या देशात, शहरी बिगरशेतकी आणि ग्रामीण शेतकरी समाजातील दऱ्या बुजल्याच नाहीत.

बळिचे राज्य येणार आहे / १९०