पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/187

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व त्यांची लूट आता व्यवस्थेच्या नावाखाली होऊ लागली. शेतकरी आपल्या देशाच्या राजांच्या विरोधात बंड करून उठू लागले. शक्य असेल त्या प्रकारे शक्य असेल तेथे राजांना विरोध होऊ लागला. 'मृच्छकटिक' नाटकात शेतकऱ्यांच्या उघड बंडाचे उदाहरण सापडते.
 शेतकरी आंदोलनाने भारतात नवे रूप धारण केले ते जातीव्यवस्थेमुळे. काही किरकोळ अपवाद वगळता, राज्यकर्ते आणि त्यांचे लष्कर व प्रशासन यंत्रणा यामध्ये गुंतलेले लोक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी अशा दोन गटांत एकच समाज विभागला होता; या दोन गटात रोटीव्यवहार होत नसे आणि बेटी व्यवहाराही होत नसे. यामुळेच कदाचित्, इतर देशांपेक्षा भारतात शेतकऱ्यांचे शोषण अधिक विक्राळ स्वरूपात झाले. इतर देशांतील सरकार व शेतकरी यांच्यातील संघर्षाचे स्वरूप हळूहळू बरेचसे सौम्य बनत गेले. याचा अर्थ असा नाही की तेथे शेतकऱ्यांच्या समस्या सर्व मिटल्या. तेथेही समस्या नेहमीच उभ्या राहतात. त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या संघटना लढत राहतात, चळवळी करीत राहतात ; पण या चळवळी कामगार, व्यापारी, कारखानदार किंवा पांढरपेशा समाजांच्या चळवळींसारख्याच होतात. या सर्वांना आपापल्या समाजाच्या हिताच्या जपणुकीसाठी दबावगट किंवा फळ्या उभाराव्या लागतात. दुसऱ्या देशांमध्ये या इतर समाजाप्रमाणे शेतकऱ्यांचाही दबावगट किंवा फळी उभी राहू शकली, कारण शेतीसंबंधात तेथील शासन आणि शासनव्यवस्था दुष्टतेने आणि निघृणपणाने चालत नाही. भारतात असे झाले नाही. जातीव्यवस्थेमुळे शेतकरी समाज शहरी समाजापासून विभक्त राहिला. तसे, शेतकरी जातीव्यवस्थेत वैश्य गणले जातात. वैश्य गावकुसाच्या आतच राहणारे; तरीसुद्धा गावकुसात राहणाऱ्या ब्राह्मण किंवा क्षत्रियांशी त्यांचे सामाजिक संबंध असत नाहीत. शेतीसंबंधीची अनेक कामे गावकुसाबाहेर राहणाऱ्या शूद्रांकडून करवून घेतली जाऊ लागली तेव्हा तर सवर्ण आणि शेतकऱ्यांमधील सामाजिक व आर्थिक दऱ्या वाढत आणि रुंदावत गेल्या.

 शेतकरी, शेतकरीजीवन आणि शेती यासंबंधी भारतात जितकी द्वेषाची आणि शत्रुत्वाची भावना आहे तितकी जगाच्या पाठीवर इतर कोणत्याही देशात आढळत नाही. भारतातील तथाकथित उच्चवर्णियांना शेतकरी, त्याचे कष्ट आणि त्याची गरिबी याबद्दल बिलकूल सहानुभूति वाटत नाही. उलट, शेतकरी शुद्ध हवा, पाण्याची रेलचेल, भरपूर फळे भाज्या, निसर्गाचा सहवास यात मस्तीने जगतो. कसल्याही प्रकारचा कर द्यावा न लागता भरपूर सरकारी

बळिचे राज्य येणार आहे / १८९