पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहणाऱ्या मानवाला टोळीअंतर्गत संबंधाने जन्मलेली प्रजा दिवसेंदिवस कमजोर होत जाते याचे ज्ञान झाले होते. त्यामुळे दुसऱ्या प्रदेशातील टोळ्यांतील स्त्रियांचे हरण करणे हे सशक्त प्रजोत्पादनासाठी आवश्यक मानले जाऊ लागले.
 या कालखंडासंबंधी, विशेषतः महिलांच्या सामाजिक स्थितीवर लुटालुटीचे जे परिणाम झाले त्यासंबंधी विस्ताराने मी अन्यत्र लिहिलेले आहे; (चांदवडची शिदोरी, अमरावतीची आयुधे). इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट ही की काळाच्या ओघात ही लुटालूटच एक व्यवस्था बनली. लुटारू सरदार, राजे, महाराजे, सम्राट बनले. दरसाल गुंडांच्या लुटालुटीस तोंड देऊन, तलवारींचे घाव सोसून लूट करवून घेण्यापेक्षा आपल्या उत्पादनातील एक हिस्सा राजे म्हणवून घेणाऱ्या लुटारूंना देणे शेतकऱ्यांनी पत्करले; महाभारतात, बकासुराची भूक भागविण्यासाठी चक्रपूरच्या लोकांनी जसे त्याला रोज गाडाभर अन्न आणि एक माणूस देण्याचे कबूल केले, तसेच.
 बकासुराचा वध करणारा भीम चक्रपुरात योगायोगाने आला हे तेथील लोकांचे भाग्य. तमाम शेतकरी मात्र तीन हजार वर्षांपूर्वीपासून बकासुराच्या औलादींना गाडे भरभरून अन्न पाठवीत राहिले आहेत. सरकार नावाच्या गोष्टींचा उगमच मुळी शेतकऱ्यांच्या लुटीत आहे. लूट करणारे किल्ले, गढ्या यांमध्ये राहतात, शहरे वसवतात आणि ते आपली फौज आणि चैनबाजी यांसाठी शेतकऱ्यांची लूट करीत आले आहेत. लुटीचे स्वरूप बदलले; कधी ती उघड उघड झाली, कधी अप्रत्यक्षपणे. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी म्हटले आहे की, सरकार नावाची जी गोष्ट असते ती शेतकऱ्यांची दुष्मनच असते अशी हिंदुस्थानातील शेतकऱ्यांची गेल्या तीन हजार वर्षांपूर्वीपासूनच्या अनुभवाने खात्री पटली आहे.
 सदासर्वकाळ शेतकऱ्यांनी लुटारूंची लूट मुकाटपणे सहन केली असे नव्हे. मग शेतकरी आंदोलनाचे पहिले स्वरूप कसे होते ? जागोजाग शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन हल्लेखोर लुटारूंना विरोध करण्याचा प्रयत्न केला; बहुतेक वेळा हा प्रयत्न निष्फळ ठरला. कधी असा विरोध सफल झाला तरी शेतकरी एक संघटना आणि एक अर्थव्यवस्था, संरक्षण-व्यवस्था उभारू शकले नाहीत. अल्पावधीतच लुटारूंच्या नव्या झुंडींनी त्यांना उद्ध्वस्त केले. वामनाने शेतकऱ्यांचा राजा बळिराजा याचा केलेला वध हे शेतकरी आंदोलनाच्या या कालखंडाचे प्रतीक आहे.

 राजांचे स्वामित्व व सार्वभौम सत्ता स्थापित झाली. शेतकऱ्यांवरील अन्याय

बळिचे राज्य येणार आहे / १८८