पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/185

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लक्षात घेता, वाटपाचा अधिकार मोठा उपयोगाचा खरा; पण त्या बरोबरच त्या सत्तेत एक धोकाही होता. दुष्काळामुळे किंवा इतर काही कारणाने अन्नाचा तुटवडा झाला तर अर्धपोटी किंवा उपाशी राहण्याची पाळी स्त्रियांवरच यायची. कदाचित्, अशाच एखाद्या अन्नाच्या तुटवड्याच्याकाळी आसपासच्या जमिनीवर उगवलेल्या धान्याचा उपयोग स्त्रियांना करावा लागला असावा आणि त्यातूनच जमिनीत बी पेरून अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी स्त्रियांनी शेतीची सुरुवात केली असावी. वेदांमध्ये जे उल्लेख सापडतात त्यावरून असे दिसते की स्त्रिया शेतीसाठी बैल किंवा इतर औजारांचा वापर करीत नव्हत्या; एका छोट्या काठीच्या, वेदांमध्ये जिला ‘स्फ्य' म्हटले आहे त्याच्या साहाय्याने स्त्रियांची शेती होत असे.
 लोकसंख्या वाढत गेली. निसर्गाने जंगलातून निर्माण केलेले अन्नाचे भांडार अपुरे पडू लागले; स्त्रियांची शेतीही अन्नाची गरज भागवू शकत नाही अशी वेळ आल्यामुळे पुरुषांनी बैलांचा वापर करून शेती करायला सुरुवात केली. स्त्रियांच्या हातून शेतीवरचा अधिकार गेला आणि अन्नाच्या वाटपाचा अधिकारही निघून गेला. एका तऱ्हेने पुरुषसत्ताक व्यवस्थेची सुरुवात बैलशेतीच्या काळापासूनच झाली.
 आता अन्नधान्य पुरेशा प्रमाणात तयार होऊ लागले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अन्न गोळा करीत वणवण करावी म्हणजे त्या दिवसाची भूक भागते, या पशुपक्ष्यांसारख्या अवस्थेतून मनुष्य बाहेर पडला. त्याची रानोमाळ होणारी वणवण थांबली. पाऊस पडला म्हणजे धान्याची कोठारे भरू लागली आणि त्या कोठारांमुळे वर्षभराची बेगमी होऊ लागली. शेतीचा हंगाम वगळता वर्षभराच्या उरलेल्या काळात शेतीतून तयार झालेले अन्न वापरत मानवाने जमिनीचा विकास, पाण्याची सोय, मंदिरांची उभारणी, सणसमारंभ, कलासंस्कृती, हत्यारे-औजारे बनविणे अशांसारखी अनेक कामे केली. अन्नधान्याचीच नव्हे साऱ्याच सुखसाधनांची मुबलकता वाढू लागली.

 दुर्दैवाने हा सुवर्णकाळ फार वेळ टिकला नाही. धान्याची कोठारे भरू लागली तसे लुटालूट करणाऱ्या झुंडी घोड्यांच्या पाठीवर स्वार होऊन हाती तलवार, भाले, धनुष्य इत्यादी हत्यारे घेऊन जायला लागल्या. एक तऱ्हेने, हा बैल संस्कृती आणि घोडा संस्कृती यांच्यातील संघर्ष होता. लुटालूट करणारे धान्यांची कोठारे, सोने, जडजवाहिर, कला आणि कारागिरीच्या वस्तू लुटून नेत असतच; वर स्त्रियांनाही उचलून नेत असत. या वेळेपर्यंत, टोळी करून

बळिचे राज्य येणार आहे / १८७