पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शेतकरी आंदोलनाला आद्य खूण गवसली



 भारतातील शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात एका नव्या युगाची पहाट झाली आहे. या नव्या युगाच्या उदयाने इतिहासाच्या चक्राचे एक परिभ्रमणही पूर्ण झाले आहे.
 भारत, ज्या देशांमध्ये शेती सर्व प्रथम सुरू झाली त्यापैकी एक आहे. म्हणून कदाचित, शेतकरी आंदोलनाचे एक इतिहासचक्र पूर्ण करून नव्या युगाला सुरुवात करणारा भारत हा पहिला देश आहे.
 हे कोणते इतिहासाचे कालचक्र आहे? आणि कोणत्या नव्या युगाच्या चाहुलीने ते पूर्ण होत आहे?
 मानवाने हेतुपूर्वक बी पेरून धान्याचे उत्पादन करायला सुरुवात केली तेव्हा शेतीची सुरुवात झाली. त्यापूर्वी मनुष्य जंगलात जाऊन फळे, पाने, फुले आणि मुळ्या गोळा करून पोट भरत असे; वनस्पतींच्या विविध गुणधर्मांविषयी आणि उपयोगांविषयी त्याने पुष्कळ ज्ञान संपादन केले होते. केवळ खाद्य म्हणूनच नव्हे तर औषधी, चित्रकेलेचे रंग इत्यादी अनेक रूपांत या वनसंपत्तीचे विविध उपयोग करण्यास तो शिकला होता; पण तरीही ही वनसंपत्ती जंगलात जेथे जशी उपलब्ध होत असे तेथून तशी तो प्राप्त करून आणत असे. म्हटलं तर, हीच मानवाची प्राथमिक शेतीपद्धती होती.

 शेतीची यापुढची पायरी स्त्रियांनी शोधून काढली. टोळीच्या समाजात जंगलातून आणलेली शिकार, फळे इत्यादी खाद्यवस्तूंचे वाटप करण्याची जबाबदारी बहुधा महिलांची असे. अन्नाच्या वाटपाची जबाबदारी हा एक महत्त्वाचा अधिकार आणि मोठे फायद्याचे कलम होते; तसेच प्रसंगी आतबट्ट्याचा कारभार होता. या अधिकारामुळे स्त्रिया टीळीतील मध्यवर्ती स्थानी होत्या. गरोदर स्त्रिया तसेच बालके आणि त्यांच्या आयांची विशेष पोषणाची गरज

बळिचे राज्य येणार आहे / १८६