काही काळ दुर्लक्ष करायला हरकत नाही आणि आपल्याला जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तेव्हा आपण परदेशातून धान्य आणत जाऊ, हिंदुस्थानातली शेती सुधारायचं काय कारण आहे आपल्याला?' यावरून तथाकथित समाजवादी म्हणवणाऱ्या माणसांचीसुद्धा संबंध देशातल्या नियोजनाबद्दल काय प्रवृती होती हे दिसून येतं; पण त्यानंतर रशिया आणि अमेरिका यांच्यातली परिरिस्थती जशी बदलत गेली जॉन फॉस्टर डग्लस् चा काळ संपला आणि वाटेल तितके पैसे देऊन धान्यधुन्य पुरवून तिसऱ्या जगातल्या देशांना आपल्या कह्यात आणण्याची आवश्यकता राहिली नाही आणि सतत आयातीवरती राहणं हे हिंदुस्थानसारख्या देशांनासुद्धा काही प्रमाणावर अपमानास्पद वाटायला लागलं त्यावेळी या धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता तयार झाली. आर. के. लक्ष्मणचं व्यंगचित्र आहे. एक पुढारी-गलेलठ्ठ- खिडकीतून पाहतो आहे-आकाशामध्ये चांगले ढग आलेले आहेत- पाऊस येताना दिसतो तो म्हणतो की, '..आमच्या देशात लक्ष घालायचं कारण नाही' असं यंदा आपण अमेरिकेला सांगू शकू बरं का? ' जर का पाऊस आला नाही तर मग मात्र अमेरिकेकडे जाऊन शरणागती घेणं आवश्यक आहे अशा तऱ्हेचं हे धोरण चालवणं हिंदुस्थानसारख्या देशाला सतत काही शक्य नव्हतं.
यात फरक झाला. उत्पादन वाढवलं पाहिजे असं बोललं जात होतं PL 480 च्या या पहिल्या काळामध्येसुद्धा, देशामध्ये उत्पादन झालं तर उत्तम पण ते उत्पादन कसं करावं, देशातली उत्पादनवाढ कशी घडवून आणावी याच्याबद्दल नेहरूंचं एक वाक्य आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की, 'देशाच्या विकासाकरिता शेतीचं अत्यंत महत्त्व आहे. शेतीइतक्या महत्त्वाचं क्षेत्र दुसरं कोणतंही नाही. शेतीवरती सगळ्या देश अवलंबून आहे. पण शेती म्हणजेच विकास काय? आपल्याला विकास घडवून आणायचा असेल तर त्याकरिता कारखानदारीची वाढ आवश्यक आहे, शेतीच्या विकासाकरितासुद्धा कारखानदारीची वाढ आवश्यक आहे; पण शेतीची वाढ ही आपल्याला घडवून आणली पाहिजे आणि दुर्मिळ भांडवल कमीतकमी शेतामध्ये वापरून आपल्याला हा विकास घडवून आणला पाहिजे.' जे म्हणायचं त्याच्या अगदी उलट सुरुवात करायची ही खास नेहरूशैली. मग शेतीमध्ये उत्पादन कसं काय वाढवून आणायचं? रशियन क्रांतीच्या आधी झारचा रासपुतीन नावाचा सल्लागार त्याला वेडेवाकडे सिद्धांत सांगत असे आणि त्यांची अंमलबजावणी झार अत्यंत क्रूरपणे करीत असे. हर्षमन हा नेहरू सरकारचा सल्लागार. त्या हर्षमनचं सबंध अर्थशास्त्रच