पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळविण्याकरिता आणि टिकविण्याकरिता एवढी कटकारस्थानं करतोस, कुणास ठाऊक कदाचित ही पृथ्वी तू गेल्यानंतर तुझ्याबरोबर स्वर्गात येणार असेल!"
 ज्यांनी ज्यांनी दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांचं इमान विकलं त्यांचे हात कुठे आभाळाला लागले नाहीत. आज लोक स्वयंस्फूर्तीने, स्वयंप्रेरणेने येतात ते स्व. वसंतराव नाईकांना श्रद्धांजली वाहायला. मोठी माणसं कोण होतात? मुख्यमंत्री खूप झाले. मी हिंदुस्थानात येऊन आंदोलन करायला लागल्यापासून किती मुख्यमंत्री झाले याची यादी करायला बसलो तर आठवतसुद्धा नाही. आता प्रवासात कुठे त्यांच्यापैकी कुणी भेटले की आठवतं, मुख्यमंत्री असताना त्यांचा काय थाट असायचा. वाटेने मुख्यमंत्री खूप पडलेत; पण आठवण होते वसंतराव नाईकांची.
 आज आम्हाला आठवण होते जोतिबा फुल्यांची. जोतिबा फुले गव्हर्नर जनरलच्या दरबारात खांद्यावर घोंगडं टाकून गेल्याची गोष्ट सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यावेळी गव्हर्नर जनरल कोण होता हे कोणाला आठवतं का? तो तर त्यावेळी थाटमाटात दरबारात बसला होता. जोतिबा फुले घोंगडं खांद्यावर टाकून गेले होते. आता जयजयकार होतो जोतिबा फुल्यांचा. आज जागोजाग पुतळे उभे आहेत जोतिबा फुल्यांचे. त्या गव्हर्नर जनरलचं नावसुद्धा कुणाच्या लक्षात नाही. मुख्यमंत्री अनेक होऊन गेले, विसरले जातील. त्यांची नावं इतिहासात राहणार नाहीत. पण वसंतराव नाईकांचं नाव इतिहासात राहणार आहे. त्यात कदाचित हेही लिहिलं जाईल की मधल्या बारा वर्षांच्या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते. त्यांचे मोठेपण मुख्यमंत्रिपदात नाही, महाराष्ट्राच्या नेतेपदात आहे.
 आणि जर का असा कुणी नेता आम्हा शेतकऱ्यांना मिळाला की राजकारणात राहून का होईना, पण शेतकऱ्यांची बाजू घेणारा, पाऊस पडत नाही म्हटल्यावर चिंतीत होणारा, विलंबाने येणारा पाऊस आला म्हटल्यावर मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या खोलीतसुद्धा दोनशे रुपयांचे पेढे वाटणारा- तर तो आम्हाला हवा आहे. 'वसंतराव नाईक' पुन्हा इथं यावा या अपेक्षेने मी पाहतो आहे असं मी सुधाकररावांच्या पत्रात म्हटलं आहे आणि तीच अपेक्षा मी इथं व्यक्त करतो.

 आम्ही कोणीही आंदोलन करण्याकरिता जन्माला आलो नाही. मी काही आंदोलन करणारा म्हणजे तरुणपणापासून झिंदाबाद म्हणत ओरडणारा मनुष्य नाही. २०/२५ वर्षांच्या सरकारी आणि संयुक्त राष्ट्रातील नोकरीनंतर मी जेव्हा शेती करायला लागलो आणि मी असं पाहिलं की शेतकरी म्हणून इमानेइतबारे

बळिचे राज्य येणार आहे / १७७