पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आणखी, कापूस एकाधिकार खरेदी योजनेबद्दल मी बोलू इच्छितो. पूर्वी व्यापारी लहान लहान सुऱ्यांनी शेतकऱ्यांच्या माना कापत असतील, तर आता या नवीन योजनेप्रमाणे दिल्लीला शेतकऱ्यांच्या माना कापणारा एक अत्याधुनिक कत्तलखाना चालू झाला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या सरसकट माना कापण्याची व्यवस्था झाली आहे. स्व. वसंतराव नाईकांची ही प्रेरणा होती का? नाही. या योजनेची सुरुवातीच्या दोन वर्षांच्या काळातील कामगिरी याची ग्वाही देते; पण, १९८६ साली केंद्र सरकारने फतवा काढला की कापूस एकाधिकार खरेदी योजनेतील कापसाचा हमी भाव आधारभूत किमतीपेक्षा जास्त असता कामा नये. मग, एकाधिकाराची मक्तेदारी शेतकऱ्यांनी कशाकरता मान्य करावी? मोठी दुर्दैवाची गोष्ट अशी की तत्कालीन मुख्यमंत्री किंवा पक्षांचे पुढारी यांपैकी कुणीही या प्रश्नावर आवाज उठवायला पुढे आला नाही. आम्ही शरद पवारांना म्हटलं, शंकरराव चव्हाणांना म्हटलं की केंद्राचा हा जो फतवा आहे तो तुमच्या योजनेच्या विरुद्ध आहे. आपण बरोबर जाऊ किंवा आम्ही बरोबर नको असल्यास तुम्ही एकटे जा आणि हा फतवा योग्य नाही असं केंद्र सरकारला सांगा. पण कुणी तयार नाही. मनात भीती, जर का कापसाच्या भावाबद्दल तक्रार केली तर मग आपल्या भाच्याला मिळायचं ते तिकीट मिळेल किंवा नाही याची खात्री सांगता येणार नाही.

 कोणाला राग यावा किंवा कोणाला टोचून बोलावे म्हणून मी हे बोललो नाही. पण, शेतकऱ्यांच्या हिताचं काही करायचं असेल तर त्या मार्गातले हे जे धोंडे आहेत ते दूर केले पाहिजेत. या शेतकऱ्यांच्या पोरांनी आम्हा शेतकऱ्यांचे फार नुकसान केलं आहे. शेतकऱ्याचा पोरगा मंत्रालयात गेला आणि त्याला एकदा का त्या गालिचावर चालायची सवय लागली की त्याला कापसाला भाव काय मिळतो त्याची पर्वा राहत नाही. त्याचं डोकं वेगळ्याच दिशेनं चालत असतं. अजून वरच्या जागी कसं जायचं आणि सध्याच्या मुख्यमंत्र्याच्या पायात पाय घालून त्या जागेवर आपला क्लेम कसा लावायचा याची चिंता त्याला पडलेली असते. मग, केंद्राच्या धोरणाविरुद्ध तो बोलत नाही. स्वत: मोठं होण्याकरिता, या शेतकऱ्यांची पोरं असलेल्या पुढाऱ्यांनी शेतकऱ्याला दावणीला बांधून त्यांचं शोषण कसं होईल या दिल्लीच्या योजनेला हातभार लावला. असं करून काय मिळवलं? कुणीही त्यांच्यातला मोठा झाला नाही. मुंज नावाच्या राजाला कालिदासानं एकदा म्हटलं की, "बा मुंजा, आजपर्यंत फार मोठेमोठे राजे होऊन गेले पण त्यांच्या एकाच्याही बरोबर काही पृथ्वी गेली नाही. तू राज्य

बळिचे राज्य येणार आहे / १७६