पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणूनच राहिले. पण, हे जसे शेतकऱ्यांचे हरितक्रांतीच्या टप्प्यातील शेवटचे नेते होते तसे आज सुधाकररावांनी मुख्यमंत्री म्हणून काही बदल केला नाही तर मला दुर्दैवाने म्हणावे लागेल की, महाराष्ट्राचे शेवटचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर, महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले नहीत. दिल्लीहून महाराष्ट्र प्रांतावर सुभेदाराची नेमणूक व्हायला लागली. सुभेदार कुठपर्यंत वर जाणार त्याच्या काही मर्यादा आहेत. पण जर का तुम्ही इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्याल तर दिल्लीमध्ये अशी कोणतीही ताकद नाही की जी तुम्हाला सांगू शकेल की तुम्ही आता इथून निघा. यामुळे निदान, त्या खुर्चीबरोबर शेतकऱ्यांचेच नव्हे तर साऱ्या देशाचे कल्याण केल्याचे समाधान मिळेल. कुणाच्यातरी वशिल्याने, कुणाच्यातरी चपला उचलल्या म्हणून किंवा कुणाचे तरी पाय पुसले म्हणून मुख्यमंत्री राहिलो असे म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या सेवेमधला गावपातळीचा कार्यकर्ता राहण्यामध्ये समाधान आहे असे जो मानील तो मोठा. स्व. वसंतरावांची प्रतिमा व प्रेरणा ही होती.
 सुधाकररावांनी पाण्याचा एक प्रश्न मांडला आणि पाण्याचा प्रश्न खरोखरीच गंभीर आहे. यंदा आता पाऊस पडला आहे. पुसद भागात चांगला झाला आहे, पिकं खरंच सुंदर आहेत. पुढं काय होतं माहीत नाही; पण आमच्या पुणे भागातला पाऊस आजवर असा आहे की विहिरींना अजून पाणी लागलेलं नाही. जर का आता पावसाने रजा घ्यायची ठरवली तर यंदा बहुतेक फेब्रुवारीपासूनच सुधाकररावांना दुष्काळाचा आणीबाणीचा कार्यक्रम राबवावा लागणार आहे. हे आता नेहमीचंच झालं आहे. अजूनही काही भागात टँकरने पाणी पुरवावं लागतंच आहे.
 दुष्काळाचा प्रश्न सोडविण्याकरिता अण्णासाहेब हजारेंनी त्यांच्या गावामध्ये काम केलं आहे. इतरही अनेक गावांमध्ये तसं काम करता येईल. काही मंडळी असंही सांगतील की झाडी लावल्यामुळे पाऊस चांगला पडतो, म्हणून झाडी लावा. तसं हल्ली झाडी लावणं हा बराच किफायतशीर 'धंदा' झाला आहे. मी दहा वर्षांपासून सांगतो आहे की झाडी लावल्याने पाऊस वाढतो ही कल्पना चुकीची आहे.

 दुष्काळाचे कायमचे निर्मूलन करायेच असेल तर नुसतं 'पाणी अडवा, पाणी जिरवा'नं भागायचं नाही, कुणी तरी सांगितलं म्हणून झाडी लावूनही पुरायचं नाही; त्याकरता, सहा वर्षांच्या पिकावर शेतकऱ्याला सात वर्षे निश्चितपणे जगता येईल असे धोरण आखले पाहिजे.

बळिचे राज्य येणार आहे / १७५