पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शेतकऱ्यांच्या पोटावर नव्हे

पाठीवर थाप मारणारा राजा हवा



 हा आगळावेगळा आणि आल्हाददायक प्रसंग आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा स्मृतिदिन आहे. सर्व गंभीर भावनाही मनात आहेत; पण प्रसंग आगळावेगळा अशासाठी की, शेतकऱ्यांच्या एका राजाचं कौतुक करण्याच्या या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती स्वतः अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा शेतकऱ्यांच्या या कार्यक्रमाला हजर राहाणं आवश्यक समजून हजर आहेत हेही विशेष आहे. सर्वसाधारणपणे पंतप्रधान, मुख्यमंत्री इत्यादी हे कारखानदारांचे, व्यापाऱ्यांचे असे कार्यक्रम झाले तर त्याला आवर्जून हजर राहतात. पण शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाला तितके आवर्जून हजर राहात नाहीत. पण हा एक अपवादाचा कार्यक्रम झाला आहे.

 वसंतराव नाईकांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्याच्या आणि ज्या आमच्या शेतकऱ्यांनी कौतुकास्पद काम करून दाखविले आहे त्यांच्या कामाचं कौतुक करण्याच्या या कार्यक्रमाला हजार राहण्याकरिता आपण मला निमंत्रण दिले याबद्दल प्रथम मी तुमचे आभार मानतो. तसा मी काही या कर्तबगार शेतकऱ्यांचं कौतुक करण्यास पात्र माणूस नाही. शेतीमध्ये मी काही प्रयोग केले असतील, नसतील. इथे जमलेली मंडळी ही वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तबगारी गाजविलेली मंडळी आहे. कुणी द्राक्षांचं काम केलं आहे, कुणी निर्यातीचं काम केलेलं आहे, कुणी रत्नागिरीला हापूस आंब्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे, मला येथे येण्याचा मान देणे म्हणजे एखाद्या नॉनमॅट्रिक माणसाला एकदम एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू नेमावं असं झालं आहे. तरीही, या कर्तबगार मंडळींना समोरसमोर भेटून त्यांच्या गळ्यात हार घालण्याचे भाग्य लाभते आहे म्हणून,

बळिचे राज्य येणार आहे / १६७