पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या काळी तर महाराष्ट्रात घनदाट जंगलांची कोठे कमतरता नव्हती? तेव्हा, दुष्काळाची उपपत्ती अस्मानी संकटाशी लावणे आणि त्या अस्मानी संकटाचा बादरायणी संबंध केवळ वनस्पतीच्या आच्छादनाशी लावणे तर्कसुसंगत नाही. या पलीकडे जाऊन असेही म्हटले पाहिजे की तर्कविसंगती काही भोळेभाबडेपणातून आलेली नाही, त्यामागे काही निश्चित बुद्धी आहे.
 या विषयावर आजपर्यंत माझ्या पाहण्यात आलेली अत्यंत खोलवर विश्लेषण करून केलेली मांडणी म्हणजे डॉ. चारुदत्त दाभोळकर यांचे 'महाराष्ट्रातील दुष्काळ व त्यावरील उपाययोजना' हे पुस्तक. आपल्या वाचनात हे पुस्तक आले असेलच. आपण पुन्हा एकदा ते जरूर नजरेखालून घालावे.

 अनेक लोकांमध्ये आणि विशेषत: पर्यावरणवाद्यांमध्ये असा विचार दिसतो की मोठ्या धरणयोजना या सगळ्या निरर्थक आहेत आणि त्या सर्व रद्द करून लहान पाणीपुरवठ्याच्या योजना आणि पारंपरिक पाणीसंकलाच्या पद्धती यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. या विचारात काही तथ्य आहे; पण बराचसा एकांगीपणाही आहे. १९५७ पासून अमलात आणलेल्या सर्व मोठ्या धरणयोजनांवर मी टीका केली आहे. या योजना प्रशासन, पुढारी आणि कंत्राटदार यांच्या सोयीसोयीच्या (Administration-friendly, Politician-friendly, Contractor-friendly)असतात हे मी आग्रहाने सांगितले आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि लाभक्षेत्र यांमध्ये प्राथमिक कार्यवाही न झाल्यामुळे धरणांवर खर्च झालेला बहुतेक पैसा गाळात गेला आहे. भूगर्भातील पाणी सिंचनव्यवस्थेतील मूलभूत अंग असले पाहिजे हेही मी आग्रहाने मांडले आहे; पण व्यापक पातळीवरील सिंचनव्यवस्थेत पाणलोट क्षेत्र व लाभक्षेत्र यांची योग्य ती निगा राखणाऱ्या मोठ्या धरणांचे महत्त्वाचे स्थान आहे हे नजरेआड करून चालणार नाही. महाराष्ट्रात दुष्काळ हटविण्यासाठी ज्या गोष्टी करावयास पाहिजेत त्यात 'कृष्णे'सारख्या योजनांचा अंतर्भाव असणे अपरिहार्य आहे. गेल्या काही दशकांत छोटे छोटे बंधारे, कोल्हापूर बांध, वसंत तलाव आणि पाझर तलाव यांची काही थोडीथोडकी कामे महाराष्ट्रातून झाली नाहीत! पण या दुष्काळाच्या वर्षी पाझर तलावांच्या आसमंतातसुद्धा दुष्काळाची दाहकता लवांशानेही कमी नाही. आपल्या कार्यक्रमातील सर्व प्रकल्प पुरे झाले तरी त्यातून महाराष्ट्र सातत्याने सुजलाम् होऊन जाईल हे एक स्वप्नरंजन आहे.

बळिचे राज्य येणार आहे / १६४