पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/161

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मालाला भाव नाही म्हणून. पाण्याच्या अडचणीचेही कारण शेतकऱ्याची आर्थिक अडचणच आहे. आमच्या पूर्वजांनी जी गावे वसविली ती काही वेड्यासारखी वसविली नाहीत. तिथले पाणी संपले तर आमची हलण्याची ताकद नाही. असेल तिथून पाणी पंपाने गावाजवळ आणण्याची ताकद नाही म्हणून पाण्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्याच्या प्रत्येक हलाखीचे मूळ कारण शेतीमालाला भाव नाही हेच आहे.
 काय गंमत आहे पाहा. पोट भरण्यासाठी शेतकरी खडी फोडतो म्हणजे काय फोडलेली खडी पोटात भरतो काय ? नाही, तो खातो ज्वारीच. ते धान्य देशात भरपूर आहे, ते पोटात घालावयास मिळावे म्हणून त्याला खडी फोडावी लागते ही काय भयानक अवस्था आहे? दुष्काळी कामावर हात फोडून घेणाऱ्या शेतकऱ्यांचे साखर कारखान्यांत पैसे ठेवीच्या रूपाने पडून आहेत; सोसायटीत, बँकेत भागाच्या रूपाने त्याचे पैसे अडकले आहेत. त्या पैशावर उचल मिळाली तरी तो खडी न फोडता पोट भरू शकेल; पण शेतीमालाला भाव नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. त्याला खडीच फोडावी लागणार आहे.
 म्हणजे, दुष्काळ काही अस्मानी संकट नाही, त्यात सुलतानीचा अंश महत्त्वाचा आहे.
 शेतकऱ्यांची हलाखी ही केवळ पावसाच्या अनियमितपणामुळे होते हे म्हणणेही फारसे बरोबर नाही. युरोपातील बहुतेक देशांत प्रत्येक वर्षातील कितीतरी महिने जमीन बर्फाच्छादित राहाते; पण तिथला शेतकरी काही देशोधडीला लागत नाही; इतर नागरिकांच्या बरोबरीने जीवनमान आणि सन्मान उपभोगतो.

 दुष्काळासंबंधी आणखी एक गैरसमज पसरलेला आहे. जंगलतोड झाली, पृथ्वीवरचे नैसर्गिक आवरण संपले त्यामुळे पाऊस अनियमित झाला व त्यामुळे दुष्काळ चालू झाले असे मत थोर माणसे मोठ्या गंभीरपणे मांडताना दिसतात. वनराई आणि पाऊसमान, विशेषत: मान्सून प्रदेशातील पाऊसमान कोणते घटक ठरवितात याविषयी गंभीर अभ्यासाला, खरे म्हटले तर, आता सुरुवात होत आहे. सूर्यावरील डागांपासून ते वाढत्या कारखान्यांच्या चिमण्यांतून बाहेर पडणाऱ्या धुरापर्यंत अनेक गोष्टींचा पाऊसमानावर परिणाम असू शकतो. काही घटक दूरकालीन आहेत, काही घटक हंगामी आहेत. दुर्गादेवीच्या दुष्काळाच्या वेळी महाराष्ट्रात सतत बारा वर्षे पाण्याचा एक थेंबही पडला नाही असे म्हणतात.

बळिचे राज्य येणार आहे / १६३