पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आनंद. चांगले पीक आले आहे तर पुढच्या दुष्काळी वर्षासाठी बेगमी म्हणून काही मोलाची, पैशाची साठवणूक करावी म्हटले तर शक्य होत नाही, कारण सगळे भाव कोसळतात, हाती काहीच राहत नाही. चांगल्या वर्षात बाकी सर्व खुश, दुष्काळात शिक्षा मात्र शेतकऱ्याला.
 देशातील निम्मे उत्पन्न शेतीतून येते. शेती बंद म्हटल्यावर इतर कामे पण कमी होत असली पाहिजेत. तेथली माणसे काही दिवसतरी दुष्काळी कामावर का येत नाहीत ? पाऊस कमी पडला म्हणजे फक्त शेतीचेच नुकसान होते असे नाही. धरणांत पाणी कमी पडते. कारखाने दोन दोन महिने बंद ठेवावे लागतात. त्या कारखान्यांचे मालक सोडा, कामगार तरी दुष्काळी कामावर खडी फोडायला येतात ? कधीच नाही.
 ते म्हणतात, 'यंदा दहाच महिने कारखाना चालला. जेवढा माल तयार झाला तेवढ्यावरच बारा महिन्यांचा खर्च टाकू किंवा आधी झालेल्या फायद्यातून या दोन महिन्यांचा खर्च चालवू. यंत्रांचे तेलपाणी, दुरुस्ती राहिली होती; या काळात ती उरकून घेऊ. म्हणजे वीज सुरू झाली की झपाट्याने उत्पादनाला लागू.'
 त्यांना घरदार कुंकून दुष्काळी कामावर खडी फोडायला यावे लागत नाही.
 दुष्काळ पडला तर शेतकऱ्यालासुद्धा म्हणता आले पाहिजे, 'यंदा पाऊसबाबाची मर्जी दिसत नाही. ठीक आहे. तो आपला काही नोकर नाही. तो आपल्या मर्जीनेच पडणार. यंदा पिकाचे काम कमी तर जमिनीची पडून राहिलेली कामे उरकून घेऊ. हरळी फार माजली आहे. नागरमुथा वेचून घ्यायला हवा. चर सावरून घ्यायला पाहिजेत, बांधबंदिस्ती सुधारायची राहिली आहे. यंदा ही कामे उरकून घेऊ म्हणजे पुढच्या वर्षी चांगला पाऊस पडला तर बंदा रुपया पीक येईल अशी व्यवस्था करू.'

 शेतकऱ्याला असे का म्हणता येत नाही? त्यालाच दुष्काळी कामावर खडी फोडावयास का जावे लागते? जेव्हा चांगला पाऊस पडतो, पीक चांगले येते तेव्हाही त्याच्या हाती काही येत नाही म्हणूनच ना? आपल्या देशात दोनचार वर्षांतून एकदा दुष्काळ येतोच. शेतकऱ्यांचे हाल होतात ते पाऊस न पडल्यामुळे नाही. जेव्हा पाऊस पडतो तेव्हासुद्धा त्याला काहीच मिळत नाही, पिकते त्यालाही भाव नाही म्हणूनच ना ? दुष्काळात शेतकरी खडी फोडतो तो त्याच्या

बळिचे राज्य येणार आहे / १६२