पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. आज काही वेगळे होईल अशी अपेक्षा नाही. पण आपल्या हातून मांडणे झाले नाही अशी रुखरुख मनात राहू नये यासाठी हा सर्व प्रपंच.
 आपल्या पत्रातील पहिल्याच वाक्यात आपण म्हणता,
 दुष्काळ हा आपल्या राज्याच्या ग्रामीण भागाचा आणि अर्थव्यवस्थेचा स्थायीभावच झाला आहे. दुष्काळ पडला की पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना काम देणे अपरिहार्य ठरते.
 या आपल्या वाक्यातच दुष्काळाच्या समस्येची गुरुकिल्ली आहे.
 पाऊस अपुरा पडला म्हणजे दुष्काळ पडतो. कधी कधी अतिवृष्टी झाली तर ओला दुष्काळ होतो. दुष्काळ पडला की शेतकऱ्याचे जीवन उद्ध्वस्त होऊन जाते. पिण्याच्या पाण्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि जगायसाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धावपळ सुरू होते. शहरांत असे काही होत नाही. महाराष्ट्रात भले दुष्काळ पडला असेल, मुंबईच्या जीवनात कोठे तसूभरही फरक पडलेला नाही. दुष्काळी कामांवर येणारे झाडून सारे शेतकरी असतात. कोणी सरकारी कर्मचारी येत नाहीत, बँकेचे लेखनिक येत नाहीत, कारखान्यांचे कामगार नाहीत. फक्त शेतकरी तेवढा फरफटत येतो; बायकापोरांसकट येतो. खडी फोडण्याची हातांना सवय नाही, हातातून रक्त येत असले तरी चिंध्या गुंडाळून किंवा पदर गुंडाळून खडी फोडतात. त्यात सगळे येतात; शेतमजूर येतात, शेतकरी येतात. मराठवाड्यात तर अगदी वीसपंचवीस एकर जमिनीचे मालकसुद्धा दुष्काळी कामावर येतात. विदर्भ हा सधन प्रदेश. आजपर्यंत दुष्काळी कामे विदर्भात माहीत नव्हती. आता तेथेसुद्धा दुष्काळी कामांच्या छावण्या चौफेर भरू लागल्या आहेत. पाऊस कमी पडला म्हणजे गाव उद्ध्वस्त, शहर निर्धास्त. शेतकरी निर्वासित आणि शहरवासीयांच्या सुखाला जराही तोशीस नाही. दुष्काळ 'भारता'चा आहे, 'इंडिया'चे सुख तो दुखावत नाही. हे काय गौडबंगाल आहे ? या प्रश्नातच दुष्काळाच्या समस्येची गुरुकिल्ली आहे.

 चांगला पाऊस पडला, अन्नधान्याची लयलूट झाली तर त्याचा फायदा काय एकट्या शेतकऱ्याला होतो? भाजीपाला, अन्नधान्य भरपूर येते, स्वस्ताई होते त्याने सगळे खुश होतात. शेतकऱ्यांपेक्षासुद्धा बिगरशेतकरी अधिक खुश होतात. सुबत्तेच्या वर्षी पोटात दोन घास जास्त जातात एवढाच शेतकऱ्याला

बळिचे राज्य येणार आहे / १६१