पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

डोळ्याला सुख वाटावे असे नमुने तयार केले आहेत. एकट्या महाराष्ट्रातच अशी पाचपंचवीस तरी उदाहरणे असतील. या नमुन्यांची आता पुनरावृत्ती सगळीकडे झाली म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न संपला, पाण्याचा मिटला, दुष्काळ हटला अशी यांची भाबडी समजूत आहे. कुटुंबातले प्रश्न आणि भातुकलीच्या खेळातले प्रश्न अलग अलग आहेत याचा त्यांच्या कविमनाला विसर पडतो. त्यांच्याबरोबर असलेले बहुतेक तर हौसे, नवसे, गवसे या सदरातच मोडणारे; 'झाडे लावा म्हणजे दुष्काळ कायमचा हटेल' असल्या तर्कविसंगत घोषणा दिवसरात्र परत परत देत राहणारे. या अशा तऱ्हेच्या संस्थांचीही दुष्काळात मोठी चलती होते.
 यंदा वळीवाच्या पावसाने अगदीच डोळे वटारले आहेत. उगाच कोठे एखादी सर शिंपडून वळीव नाहीसा झाला आहे. उद्या जर का महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत वळीवाचे ढग भरून आले आणि जोरदार पाऊस झाला, थोडेफार का होईना, ओढे, नाले, तळी, तलाव भरून आले तर दुष्काळाचा विषय कोणाच्याच विषयपत्रिकेवर राहणार नाही. राज्यकर्त्या पक्षाला त्याचा विसर पडेल, विरोधक काही नवीन सनसनाटी विषयाच्या शोधास लागतील आणि पर्यावरणजीवी संस्था व व्यक्ती त्यांचे परिसंवाद, अभ्यास, जाहीरनामे यांमध्ये दुष्काळाविषयी थोडे कमी बोलतील.

 या दुष्काळाच्या कठीण अवस्थेत का होईना, दुष्काळ कायम हटविण्याकरिता काही कार्यक्रम उभा करण्याचे आपण व आपल्या सहकाऱ्यांनी मनात घेतले आहे त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. महाराष्ट्रात आजपर्यंत असा एकही दुष्काळ झाला नाही की ज्या वेळी दुष्काळाचा कायमचा बंदोबस्त करून टाकण्याची भीमगर्जना झाली नाही. या विषयावर फॅमिन कमिशन्स नेमण्यात आली, तज्ज्ञ समित्या नेमण्यात आल्या, अहवाल झाले, पाण्याच्या सिंचनाच्या काही योजना झाल्या; पण दुष्काळ बेटा काही कायमचा हटायला तयार नाही. अपणास नाउमेद करण्याकरिता मी हे लिहितो आहे असे नाही. उमेद गमावणाऱ्यांपैकी आपण नाही हे मी पाहतोच आहे आणि म्हणून काही गोष्टी आपणास लिहिण्याचे मनात आणले आहे. त्यांचाही आपण विचार करावा. १९८२ पासून जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात कमी-अधिक दुष्काळसदृश परिस्थिती तयार झाली तेव्हा तेव्हा या सर्व गोष्टी मी पुढे मांडल्या आहेत. त्यावेळी

बळिचे राज्य येणार आहे / १६०