पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाला आहे. शहरा-शहरात, गावा-गावात अमानुष क्रौर्याचे आणि गुंडगिरीचे प्रकार सर्रास घडत आहेत. या परिस्थितीत नव्या सत्ताधाऱ्यांबद्दल लोकांच्या मनात एक सहानुभूतीही तयार झाली आहे. सर्वसामान्य शेतकरी आज रस्त्यावर उतरायला तयार नाही. स्वातंत्र्ययुद्धाच्या अपुऱ्या राहिलेल्या उद्दिष्टांसाठी आंदोलनच आवश्यक असेल तर आज तरी शेतकरी त्यासाठी तयार दिसत नाही.
 गेल्या दहा वर्षांमध्ये संघटनेने जे काही मिळविले ते खरोखर अलौकिकच. स्वातंत्र्यवर्षाच्या काळात फार काही करावे लागले नाही आणि तरीदेखील जवळजवळ ४००० कोटी रुपयांची कर्जमुक्ती आणि जवळजवळ तितक्याच रकमेची वाढीव भावाच्या रूपाने उत्पन्नात वाढ ही काही थोडी मजल नव्हे; पण यापेक्षा पुष्कळ जास्त प्राप्त करण्याची संधी आपल्यासमोर इतिहासाने आणून ठेवली होती तिचा पुरेपूर फायदा आपण घेऊ शकलो नाही ही गोष्ट खरी. महाराष्ट्रातील संघटनेचा पाईक आणि संघटना कोठे कमी पडली?
 एक साधी सरळ दिसणारी कमजोरी. याबद्दल काही वादविवाद होऊ नये. शेतकरी तितुका एक एक असे आपण म्हटले, काही प्रसंगी संघटना जातिधर्माच्या कल्पनांवर मात करून अर्थवादी भूमिका घेऊ शकते हे संघटनेने दाखवून दिले आहे. छोटे मोठे शेतकरी हा भेद आपण मानत नाही हेही आग्रहाने आपण सांगत आलो आहोत; पण जातीयवाद आणि धर्मवाद यांच्या प्रभावातून सर्वसाधारण शेतकरी पाईक सुटला आहे असे काही दिसत नाही. शेतकरी संघटनेने अयोध्या मंदिराविषयी किंवा जातीयवादी पक्षांविषयी घेतलेली भूमिका अनेक कार्यकर्त्यांना खरे म्हटले तर पचली नव्हती. शेतकरी संघटनेच्या भूमिकेला उघड विरोध कोणाच पाईकाने केला नाही; पण काही जणांनी संघटनेच्या कार्यक्रमांतून अंग काढून घेतले, काहींनी निदान मतदान करताना आपल्या पूर्वसंस्कारित प्रवृत्तींना मोकळी वाट करून दिली. पण निष्ठेने जातीयवाद व धर्मवाद यांच्याविरुद्ध उभे राहण्याची मानसिक ताकद फार थोड्या शेतकऱ्यांनी आणि पाईकांनी दाखविली.

 शेतकरी संघटनेची राजकीय भूमिकाही बहुसंख्य पाईकांनाच नव्हे तर संघटनेच्या बिनीच्या कार्यकर्त्यांनासुद्धा पचायला जड गेली. संघटना गैरराजकीय आहे, सर्वच राजकीय पक्ष चोर आहेत, छोटा चोर आणि मोठा चोर यांतील समतोल साधणे हे संघटनेचे राजकारण आहे ही वाक्ये अनेकदा घोकली गेली; पण प्रत्येकाच्या मनात त्याचा एक लाडका राजकीय पक्ष असतो. संघटनेचे धोरण त्या त्या लाडक्या पक्षास सोयीस्कर व पोषक असेपर्यंत संघटनेची वाहवा

बळिचे राज्य येणार आहे / १४३