पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


आहुती सेनापतीची मंगल होवो तुला



 'शेतकरी संघटक'चा हा अंक प्रकाशित होईल तेव्हा ७४ वे वर्ष संपून मी ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याला तीन दिवस होऊन जातील. कार्यकर्त्यांच्या हाती हा अंक पडेपर्यंत ७५ व्या वर्षातला माझा पहिला आठवडा पुरा होऊन गेला असेल.
 एका वयानंतर वाढदिवस हा काही आनंदाने साजरा करण्याचा प्रसंग राहत नाही. आयुष्याची गाडी बऱ्यापैकी उतरणीला लागल्यानंतर, उमेदीच्या वर्षांत काय घडले, काय झाले, काय केले, काय करायला हवे होते याचा विचार साहजिकच डोकावून जातो.
 पुढच्या आयुष्यात काही आशादायक काळाची अपेक्षा असेल तर अशा तऱ्हेच्या आत्मचिंतनाची फारशी आवश्यकता वाटत नाही; प्रगतीच्या वाटेवर आहोत तर पूर्वायुष्यात जे जे काही झाले ते योग्यच होते, निदान त्यात काही फारसे चूक नव्हते अशी समजूत बुद्धी आणि मन आपोआपच करून घेतात. हेच आयुष्य पुन्हा एकदा जगायला मिळाले तर आयुष्याच्या होडीला जी जी दिशा पाण्याच्या प्रवाहाने किंवा वाऱ्याने दिली ती आपल्या सुदैवाने अनुकूल अशीच झाली आणि वर्तमानकाळातील भाग्य आपल्या कर्तृत्वाइतकेच दैवयोगाने आणि नियतीने घडवून आणले अशी मनाची सहज समजूत होते.
 ७५ व्या वर्षाच्या सुरुवातीला माझी अशी स्थिती नाही हे उघड आहे. आजतरी मला, येणाऱ्या उष:कालाची अंधुकही छटा पूर्वक्षितिजावर दिसत नाही.

 शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात प्रेमाच्या माणसांना लाथाडून देशभर फिरलो. त्यांचे शाप मला लागले का काय अशी शंकाही मनात येऊन जाते. रूढार्थाने माझ्यासारख्या नास्तिकाला ही भावना उचित नाही. मानसिक

बळिचे राज्य येणार आहे / १३४