पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तीव्र विरोध करणारी मंडळी सर्वकाळ असतात. आगगाडी आली की तिला विरोध करणारे होते, कारखाने आले त्यांना विरोध करणारे होते, खाणींनाही विरोध करणारे होते. हे सर्व घुबडासारखे दिवाभीत आहेत.
 जितके आपण प्रयोग करतो तितकी ज्ञानाची प्रगती होते; जितके आपण प्रयोगाला नाकारू, तितकी 'ब्राह्मणी'व्यवस्था तयार होते; जे काही ज्ञान आहे ते आमच्याकडे आहे. बाकी कोणी प्रयोग करण्याची गरज नाही, बाकी कोणी ग्रंथ वाचू नये, आम्ही जे काही म्हणतो ते तुम्ही ऐका असे म्हणणारांची 'ब्राह्मणी'व्यवस्था तयार होते. बियाणे कोणते वापरायचे ते आम्ही तुम्हाला सांगू, तुम्ही प्रयोग करू नका हा ब्राह्मणीवाद शेतकऱ्यांना जैविक तंत्रज्ञानापासून दूर ठेवण्याकरिता वापरला जात आहे.
 शेतकरी संघटनेची या विषयावरची भूमिका साधी आणि सोपी आहे. या तंत्रज्ञानाचे जर काही वाईट परिणाम असतील तर ते वाईट परिणाम दूर करण्याकरिता अजून नवीन तंत्रज्ञानच उपयोगी पडेल. जसे हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानातील दोष दूर करण्याकरिता जैविक तंत्रज्ञान पुढे आले तसे जैविक तंत्रज्ञानातील दोष दूर करण्याकरिता पुढील शास्त्रीय पायरी चढावी लागेच, त्याऐवजी 'शेण आणि मूत' नाही वापरून चालणार.
 शेतकरी संघटनेची भूमिका एवढीच आहे की तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणी भिंती बांधू नयेत. शेतकऱ्यांना खुलेपणाने प्रयोग करायची संधी मिळू द्यावी. त्यांचा त्यांना निर्णय घेऊ द्या की अमुक एक बियाणे वापरले तर पुढच्या वर्षी नवीन बियाणे विकत घ्यावे लागते तरी ते परवडते की नाही ते. कोणी तरी दिल्लीत बसून ते ठरवता येणार नाही.
 शेतकरी प्रयोगशील आहे, त्याला तंत्रज्ञान निवडीचे स्वातंत्र्य असायला पाहिजे. दुसऱ्या कोणाच्या ओंजळीतून तुटपुंजे तंत्रज्ञान स्वीकारण्यात शेतकऱ्यांना स्वारस्य नाही हे सिद्ध करण्यासाठी, इतर राज्यांत नवीन वाणांच्या प्रयोगांना विरोध होत असला तरी महाराष्ट्रातले शेतकरी नवीन वाणांचे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करून त्यातले फायदे तोटे पडताळून पाहतील.

(दिनांक १६ जून १९९९ रोजी पुणे येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या

बैठकीसमोर श्री. शरद जोशी यांनी केलेल्या भाषणातील तंत्रज्ञानविषयक भागाचे शब्दांकन.

शेतकरी संघटक, ६ जुलै १९९९)

बळिचे राज्य येणार आहे / १३३