पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शेतकऱ्यांचे तंत्रज्ञान स्वातंत्र्य



 ध्या जैविक बियाण्यासंबंधी सर्व जगभर चर्चा चालू आहे. बरेच जण त्यांच्या विरोधात आहेत. या बियाण्यांसंबंधी शेतकरी संघटनेची भूमिका वेगळी आहे.
 फार पूर्वीपासून आपले वाडवडील आपल्या शेतात जे काही पीक आले असेल त्यातले चांगले जे काही असेल ते पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून बाजूला काढून ठेवत असत. एखाद्या मालाचे दाणे मोठे असणे म्हणजे चांगले असेल तर मोठे मोठे दाणे निवडून बियाणे म्हणून वेगळे ठेवले जायचे. असे पिढ्यान् पिढ्या चालले म्हणजे त्या वाणाचा आकार मोठा मोठा होत जातो.
 हरित क्रांतीच्या वेळी काय केले? जर का मोठ्या दाण्याचे उत्पादन पाहिजे असेल तर मोठ्या दाण्याच्या रोपाच्या फुलांचे पुंकेसर आणि लहान दाण्याच्या रोपाच्या फुलांचे स्त्रीकेसर यांचा संकर घडवून आणून असे वाण तयार केले गेले की त्याला खते आणि औषधे पुरेशा प्रमाणात मिळाली तर भरघोस पिक ते देते. वाण चांगले नसेल तर कितीही खते आणि औषधे दिली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. पण वाण चांगले असेल तर ते खताला आणि औषधाला प्रतिसाद देते आणि उत्पादन वाढते. अशा वाणांच्या विकासाने हरित क्रांतीला सुरुवात झाली. उत्पादन वाढले पण समस्याही उभ्या राहिल्या. या वाणांना खते आणि औषधे जास्त वापरावी लागतात. त्यामुळे खर्च जास्त होतो एवढेच नव्हे तर खताऔषधांच्या अतिवापरामुळे निसर्गाचा, पर्यावरणाचा नाश होऊ लागला ; नद्यांमधील मासे मरू लागले, नद्यांचे पाणी दूषित होऊ लागले.

 हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे ही समस्या उभी राहिलेली दिसायला लागल्यानंतर काही मंडळींनी धोशा लावला की खतांचा आणि औषधांचा वापर सोडून द्या

बळिचे राज्य येणार आहे / १३०