पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तरीही एका दिवशी शेतकऱ्यांच्या हाती नुकसानभरपाईच्या रकमा येऊन पडल्या. सध्या अमलात असलेल्या योजनेला 'पीक विमा योजना' म्हणणे अयोग्य आहे.
 'पीक विमा' कसा पाहिजे ?
 खरीखुरी पीक विमा योजना मोटार अपघाताच्या विमा योजनेप्रमाणे चालली पाहिजे. कोणाही शेतकऱ्यास कोणत्याही प्रदेशात तो पीक-कर्जदार असो किंवा नसो, पिकाचा विमा उतरवता आला पाहिजे. वेगवेगळ्या पिकांच्यासाठी लागणारा खर्च वेगवेगळा ; त्यामुळे, हातात पडणारी मिळकतही वेगवेगळी. त्यामुळे प्रत्येक पिकाच्या बाबतीत हप्त्याची आणि नुकसान भरपाईची रक्कम वेगवेगळी असणार हे उघड आहे. पीकबुडीचा धोका वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीत थोडाफार वेगळा असू शकतो; पण अनेक अहवाल आणि अभ्यास यावरून असा निष्कर्ष निघतो की, पीकबुडीचा धोका हा व्यवस्थापन आणि भांडवल गुंतवणूक यांच्याशी अधिक निगडित आहे. मोटार अपघाताच्या विम्याची आणि हप्त्याच्या रकमा वेगवेगळ्या असतात; पण हप्ता आकारला जातो तो प्रामुख्याने ती गाडी चालवणाऱ्या माणसांच्या अपघाताच्या इतिहासाच्या आधारे. हीच गोष्ट शेतकऱ्यांच्या बाबतीतही खरी आहे. समजा, द्राक्षाचे पीक एकरी लाख रुपये देते आणि कांद्याचे एकरी दहा हजार. द्राक्षाचा विम्याचा हप्ता पिकाच्या रकमेच्या ८ % असला तर कांद्याचा हप्ता २ ते ३ % असेल; पण काही कुशल शेतकऱ्यांच्या बाबतीत नुकसानीचा अनुभव अगदी वेगळा असू शकेल आणि त्यामुळे त्यांना आकारण्यात येणारा हप्ता वेगवेगळा असू शकेल.

 टक्केवारीचीच गोष्ट निघाली तर पीक बुडण्याच्या धोक्याची टक्केवारी काय हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. विमा म्हणजे काही संकटग्रस्तांना आकाशातून मिळणारी मदत नाही. संकट ज्यांच्यावर कोसळू शकते अशांनी एकत्र यावे, एक निधी तयार करावा आणि त्या निधीतून ज्यांच्यावर प्रत्यक्षात संकट येऊन कोसळते त्यांना काही भरपाई मिळावी हे विम्याचे मूलभूत तत्त्व आहे. अगदी साध्या उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट होईल. २४ वर्षे वयाच्या नागरिकाचा एक वर्षाचा जीवन विमा उतरवायचा आहे. या वर्षात जे मृत्यू पावतील त्यांना एक लाख रुपयाची भरपाई द्यावी अशी योजना आहे. मृत्यूसंबंधीची सारी आकडेवारी पाहिली तर असे दिसते की, २५ व्या वर्षात संबंधित समाजातील व्यक्ती मरण पावण्याची शक्यता फक्त २ % आहे. मग या योजनेतील प्रत्येक विमाधारकाचा हप्ता एक लाख रुपयांच्या दोन टक्के म्हणजे रु. २०००/- होईल. याच पद्धतीने

बळिचे राज्य येणार आहे / १२७