पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 म्हणजे, राहता राहिलेली पीकबुडीची कारणे कोणती? पाऊस थोडाफार अनियमित झाला, रोगराई आली, बियाणे अपेक्षेप्रमाणे उगवले नाही, फुलले नाही, फळले नाही आणि अशा कारणांमुळे पिकांचे नुकसान झाले, म्हणजे विमा कंपनीने ठरविलेल्या पातळीपेक्षा कमी उत्पादन झाले तर अशाप्रकरणी विमायोजना लागू होऊ शकते.
 पीकविमा योजना म्हणजे अगदीच काही नवीन अफलातून कल्पना नाही. एक प्रकारची पीक विमा योजना आजही देशात काहीकाही तालुक्यांत, जिल्ह्यांत अमलात आहे. एका राष्ट्रीयीकृत सर्वसाधारण विमा कंपनीच्या सहकार्याने सरकारने या योजना चालवल्या आहेत. खऱ्या अर्थाने पाहिले तर त्यांचे 'पीक-विमा योजना' हे नामाभिधान गैरलागू आहे. योजनेचा आराखडा पाहिला आणि अंमलबजावणी पाहिली तर तिला 'सामूहिक पीक कर्ज विमा योजना' असे नाव देणे अधिक संयुक्तिक ठरेल. या योजनेत विमा कोणाही शेतकऱ्यास त्याच्या इच्छेप्रमाणे उतरवता येत नाही. काही तालुक्यांत काही पिकांसाठीच केवळ विमा योजना लागू झाल्याचे सरकार जाहीर करते. अशा प्रदेशात विमा योजना लागू असलेले पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी पीककर्ज घेतात त्यांना ही विमा योजना आपोआप लागू होते. कर्ज देतानाच विम्याच्या हप्त्यापोटी काही रक्कम कापून घेतली जाते. हप्त्याचा काही बोजा सरकार स्वत: उचलते.

 विमा क्षेत्रातील विमा पीक विमा योजनेने ठरविलेल्या पातळीपेक्षा कमी आले तर त्या क्षेत्रातील सर्व पीककर्जदारांना कर्जाच्या रकमेतील नुकसानीच्या टक्केवारीनुसार काही रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळते. साऱ्या तालुक्यात पीक बरे आहे पण एका शेतकऱ्याच्या शेतात मात्र पीक फसले असे घडले तर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला काहीही भरपाई मिळत नाही. योजनेची अंमलबजावणी मोठी तर्कटी आणि विचित्र होते. एका वर्षी पावसाच्या सुरुवातीस सौराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कापसासाठी पीककर्जे घेतली, विम्याचा हप्ता भरला, बियाणे खरीदी केले; पण पाऊस झालाच नाही. पाऊसच नाही तर पेरणी करण्यात काय अर्थ आहे म्हणून त्यांनी पेरणी केलीच नाही. सरकारने नुकसानभरपाई नाकारली. पेरणीच केली नाही तर पिकाच्या नुकसानीचा प्रश्नच कसा उद्भवतो? थोड्या हमरीतुमरीनंतर, ज्यांनी बियाणे निदान शेतात टाकून दिले होते त्यांना काही प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली, बाकीच्यांना नाही. नाशिक जिल्ह्यात याच्या उलट घडले. पीक फारसे समाधानकारक नव्हते; पण अगदी वाईटही नव्हते.

बळिचे राज्य येणार आहे / १२६