पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ओझे मात्र शेतकऱ्याने घ्यायचे अशी व्यवस्था टिकू शकणार नाही. कत्तलखान्यातील कत्तली थांबतील, पण शेतकऱ्याच्या घरची हेळसांड थोडीच थांबणार आहे? कत्तलीवर बंदी घातली तर मेलेल्या जनावरांचा उपयोग करण्यात आला असे नाटक सहज वठवता येईल. मग, गाय-बैल खरोखरच नैसर्गिकरीत्या मेले की खाण्यापिण्याची हेळसांड झाल्यामुळे मेले की औषध घालून मारले गेले याची प्रत्येक वेळी चौकशी करावी लागेल. प्रत्येक गाय-बैलाचे शवविच्छेदन करावे लागेल. शेतकऱ्यांना कचाट्यात पकडून त्यांच्याकडून आणखी दक्षिणा उकळू पाहणाऱ्या नोकरशहांची आणखीच चंगळ होईल.
 गोवंश हत्याबंदी पशुपालनाच्या सर्व सिद्धांताविरुद्ध आहे. गायीचा गोठा किफायतशीर व्हायचा असेल तर पुऱ्या कळपातील गायींची दररोजच्या दुधाची सरासरी ८ लिटर तरी असली पाहिजे. म्हणजे, वीतानंतर वीसबावीस लिटरपेक्षा कमी दूध देणारी गाय आर्थिकदृष्ट्या निव्वळ बोजा आहे. चांगल्या चांगल्या गायींचे संवर्धन आणि कमअस्सल गायींना गोठ्यातून काढणे ही दूधउत्पादनातील आणि यशस्वी पशुसंवर्धनातील गुरुकिल्ली आहे. त्यांचा मान राखला नाही तर काय होईल ? गायींची पूजा करणाऱ्या भारतातील गायी सर्वात कमअस्सल आणि जेथे गाय खाल्ली जाते तेथे गायीच्या सर्वोत्कृष्ट जातींचे संवर्धन असे विचित्र दृश्य चालूच राहील.
 पण हे सर्व बाजूला ठेवून, भावनेपोटी, गायीची कत्तल होता कामा नये असा आग्रह धरण्यात चूक काही नाही. तसे करायचे ठरले तर येथील दुधाची किंमत जगातील इतर देशांच्या तुलनेने निदान दुप्पट राहील. ती देण्याची तयारी, गायीविषयी पूज्य भावना बाळगणाऱ्यांनी ठेवली पाहिजे. 'तुम्ही गायी सांभाळा आम्ही वसूबारसेला हळद कुंकू वाहू' असली दांभिकता काय कामाची?

(शेतकरी संघटक, २१ ऑगस्ट १९९५)

बळिचे राज्य येणार आहे / १२३