पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एका सर्वोदयी नेत्याने या विषयावर चांगले तास दोन तासांचे प्रवचन ऐकवले होते. ते गेल्यानंतर शेतकरी संघटनेच्या बैठकीस सुरुवात झाली. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसमोर मी शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावाचे विस्तृत निरूपण केले. शेतीच्या आणि गरिबीच्या सर्व समस्यांचे एक सूत्र रास्त भाव आहे आणि सर्व प्रश्न सोडवण्याची गुरुकिल्ली रास्त भाव आहे हे सांगितले. त्यानंतर एका शेतकरी कार्यकर्त्याने उठून म्हटले, 'शरदजी, तुमचा मुद्दा आम्हाला पटला. तुमच्या आंदोलनात आम्ही जरूर सामील होऊ; पण येथे मध्य प्रदेशात आमच्यापुढे त्याहीपेक्षा एक मोठी समस्या आहे. गावोगावी भाकड गायींचे कळप संख्येने वाढत चालले आहेत. त्यांना पोसण्याची जबाबदारी साऱ्या गावाची. त्यांनी कोठे तोंड लावले तर त्यांना हुसकतासुद्धा येत नाही; लाठी चालवणे दूरच राहिले. कुंपण नसले तर कळपच्या कळप शेतात घुसून पिकाची धूळधाण करतात. शरदजी, हमे गायसे बचाओ, वाजिब दामका मामला हम निबट लेंगे ।' शेतकऱ्यांच्या मनातील भावना आणि शेतकऱ्यांचे नाव पुढे करून बोलणाऱ्यांचे युक्तिवाद यातील तफावतीने मला मोठा धक्का बसला.

 महाराष्ट्रात काही जिल्हे सोडल्यास असे मोकाट जनावरांचे कळप नाहीत; पण तरीदेखील दावणीला असलेल्या जनावरांची संख्या सारखी घटत असते हे रहस्य समजून घेण्यासाठी सोळा-सतरा वर्षांपूर्वी आम्ही बैलाचा उत्पादनखर्च काढण्याचा उपद्व्याप केला होता. जन्मल्यापासून अडीचतीन वर्षे गोऱ्हयाला चांगले पोसावे तेव्हा तो कामास येतो आणि वय झाल्यानंतर जुवाखालून निघाल्यानंतर चारपाच वर्षे तरी बैलाला तसेच पोसावे लागते. मधल्या सात-आठ वर्षांच्या काळात तर त्यांच्या पोषणाचा खर्च खूपच वाढतो. पेंड, वैरण, हिरवा चारा काहीच तोडता येत नाही; नाहीतर शेतीची कामे होतच नाहीत. सतरा वर्षांपूर्वी बैलाच्या आयुष्यात दर दिवशी त्याच्या खाण्याचा खर्च २८ रुपये येतो, असा निष्कर्ष निघाला. शेतातले गवत असले तरी ते काही फुकट नाही, तेही विकतच घेतले आहे असे गृहीत धरून हा हिशेब काढला होता. आयुष्यभर, वर्षभर दरदिवशी २८ रुपये खर्चुन पोसलेल्या बैलाचा उपयोग त्याच्या उमेदीच्या वर्षात दरवर्षी जास्तीत जास्त ४० दिवस असतो. त्याकाळी भाड्याने बैलजोडी ३०रु. ने मिळत असे. बैल ठेवणारा शेतकरी शेतीतून सहीसलामत जगण्यावाचण्याची शक्यता शून्य. त्याच्या शेणामुतामुळे होणारा फायदा लक्षात घेऊनही बैल ही न परवडणारी गोष्ट आहे असा निष्कर्ष निघाला.

बळिचे राज्य येणार आहे / १२१