पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या वसाहती आणि हिंदुस्थानसारखे देश म्हणजे साम्राज्याचा भाग. या वसाहती आणि साम्राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचं शोषण करून पश्चिमात्य देशांनी आपल्या औद्योगिकीकरणाचा पाया घातला.
 वसाहती हळूहळू स्वतंत्र झाल्या. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध होऊन गेले होतं, त्याच्यानंतर कॅनडाही स्वतंत्र झाला; ऑस्ट्रेलियातही, तो राणीला मानणारा देश असला तरी, इंग्लंडची अधिसत्ता राहिली नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर, हिटलर आणि जपानने काय गोंधळ घातला असेल तो असो पण जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत साम्राज्ये हटायची नाहीत अशी जी काही भावना लोकांच्या मनात होती ती नक्की गेली. वसाहती आणि साम्राज्ये सांभाळायची असतील तर केवळ प्रचंड फौजा आणि बंदुकींच्या साहाय्यानेच सांभाळता येतील अशी परिस्थिती तयार झाली.
 दुसऱ्या महायुद्धाच्या धगीमधे पोळून निघालेल्या साम्राज्यवादी देशांना हे परवडण्यासारखं नव्हतं आणि ते करण्याची त्यांची तयारीही नव्हती. म्हणून दुसरं महायुद्ध संपल्यानंतर १९४५ते ५२ या आठ वर्षांमध्ये मोठ्या संख्येने देश साम्राज्यातून मोकळे झाले, स्वतंत्र झाले. जुन्या वसाहती, हिंदुस्थानसारखे नव्याने स्वतंत्र झालेले देश सोडताना साम्राज्यवाद्यांची काही युक्त्या केल्या. एकाचे दोन देश, तीन देश, चार देश असे तुकडे केले. ज्याला आपण आज तिसरं जग म्हणतो त्या तिसऱ्या जगातील देश राजकीयदृष्ट्या का होईना १९४७ नंतर स्वतंत्र होऊ लागले.
 या स्वतंत्र झालेल्या देशांनी आर्थिक विकास करण्याकरिता, प्रगती करण्याकरिता १९४७ पासूनच प्रयत्न चालू केले. कुणी आपल्याला समाजवादी म्हणवलं, काही जणांनी समाजवादी पद्धती आहे म्हटलं, काहींनी स्वतःला अगदी कम्युनिस्ट म्हणवलं, काहींनी खुल्या बाजारपेठच्या व्यवस्थेचा पुरस्कार केला; पण प्रत्येक देशात काही ना काही नियोजनाची पद्धती उभी राहिली आणि गेली ४० वर्षे या पद्धतींनी काम चालू आहे.

 इंग्लंडमध्ये भांडवलशाही औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली तेव्हा विकासाच्या प्रक्रियेमध्ये शेतीचं स्थान काय, भूमिका काय याविषयी प्रचंड वादविवाद झाला. रशियामधील समाजवादी औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीला पुन्हा तसाच वादविवाद झाला, संघर्ष झाले; पण दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या तिसऱ्या जगामध्ये औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली तेव्हा तशा प्रकारचा वादविवाद निदान शेतकरी संघटनेचे आंदोलन चालू होईपर्यंत कुठेही

बळिचे राज्य येणार आहे / १३